भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार मयांक अग्रवाल याला विमानात विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. फ्लाइटमध्ये पाणी प्यायल्याने अग्रवाल आजारी पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्रिपुरातील आगरतळा येथून सुरतला जात असताना ही घटना घडली. मयांकने सीटसमोर ठेवलेले पाणी प्यायले. पाणी प्यायल्याबरोबर त्याची जीभ, तोंड आणि गाल भाजल्यासारखे झाले. मयांकला बोलता येत नव्हते. त्याला तातडीने आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयात हलवण्यात आले.
अग्रवाल याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विमानातील कर्मचाऱ्यांनी पाण्याची बाटली ताब्यात घेऊन तपास सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्यात ॲसिड मिसळल्याचा संशय आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार तो आऊट ऑफ डेंजर आहे...
मयांक सध्या रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकचे नेतृत्व सांभाळतोय आणि त्याने गोवा व कर्नाटक यांच्याविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. त्याने भारताकडून २१ कसोटीत ४१.३३च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ६ अर्धशतकं आहेत. ९८ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १७ शतकं व ४० अर्धशतकांच्या जोरावर ७४३० धावा केल्या आहेत आणि नाबाद ३०४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.