Mayanti Langer vs Wasim Akram: आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करता आले नाही आणि संपूर्ण संघ १४७ धावांवर गारद झाला. या पराभवाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रम मैदानात बोलताना आक्रमक आवेशात दिसला.
वासिम अक्रम आपल्या कारकिर्दीत आक्रमक खेळाडू आणि गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. पण रविवारी आशिया कपच्या फायनल नंतर तो मैदानात टीव्हीवर बोलताना काहीसा आक्रमक दिसून आला. आशिया कप-2022चे अधिकृत ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्स वासिम अक्रम आणि अँकर मयंती लँगर काम करत आहेत. यावेळी मयंती लँगरने वासिम अक्रमला प्रश्न विचारला. त्यावर अक्रमने काहीसं आक्रमक शैलीत उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
नक्की काय घडलं?
मयंती लँगर-बिन्नी हिने प्रश्न विचारला, "वासिम अक्रम, आता (पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे) तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहेत, याचा मी अंदाज लावू शकते. पण ज्या संघाला कोणीच विजेतेपदाचे दावेदार मानत नव्हते, अशा 'अंडरडॉग' मानल्या जाणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक जिंकला. यावर तुमचं मत काय?" या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वप्रथम वासिम अक्रमने अतिशय आक्रमक शैलीत भाष्य केलं. "माझ्या डोक्यात काहीही चालू नाहीये", असं तो अगदी रोखठोकपणे म्हणाला. त्यानंतर पुढे तो म्हणाला, "श्रीलंकेच्या संघाने फायनलमध्ये आणि सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात ज्या प्रकारचा खेळ खेळून दाखवला, त्यावरून तो विजेतेपदासाठी योग्य संघ आहे हे सिद्ध होते." अक्रमने वाक्य सांभाळून घेतलं असलं तरी त्याच्या उत्तरातून त्याला आक्रमकपणा दिसून आला.
पाहा मयंती लँगर-वासिम अक्रम यांच्या संवादाचा व्हिडीओ-
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात श्रीलंकेला अफगाणिस्तानच्या संघाने एकतर्फी मात दिली होती. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या तुलनेने बलाढ्य संघांसमोर इतर कोणताच संघ टिकणार नाही, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होता. पण तसे घडले नाही. भारत सुपर-४ फेरीतून स्पर्धेबाहेर गेला. पण पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली. असे असूनही, श्रीलंकेने यंदाच्या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत पाकिस्तानला धूळ चारली आणि विजेतेपद पटकावले.