रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या ( IPL 2020) पर्वाचे विक्रमी जेतेपद पटकावले. रोहितनं पाचव्यांदा MIला आयपीएल जेतेपद पटकावून दिले आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मान पटकावला. या यशस्वी कामगिरीनंतर रोहितला टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधार बनवावे, अशी मागणी माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं केली. त्याच्या या मागणीला अनेकांनी पाठींबा दिला, तर काहींनी विरोध केला. पण, आता विराट कोहलीनंच कर्णधारपदावरून पायउतार होताना रोहितकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी समोर येत आहे. ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग!
इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन यानंही रोहितच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केलं आहे. रोहितचं नेतृत्व हे शांत आणि संयमी आहे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तही हे यश तो कायम राखू शकेल, असेही हुसैन म्हणाले. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता विराट कोहलीनं कर्णधारपदावरून पायउतार होऊन रोहितकडे जबाबदार सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही ते म्हणाले. ''रोहितचे कर्णधारपद शांत, संयमी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारे आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वेगवेगळ्या देशांचे खेळाडू असूनही रोहितनं यश मिळवून दाखवले. त्यामुळे टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. विराट कोहलीनं कर्णधारपदावरून पायउतार व्हायला हवं. रोहितचे रेकॉर्ड बोलके आहेत,''असे ते म्हणाले. रोहित शर्मा RCBला आयपीएल जेतेपद जिंकून देऊ शकेल का? माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरला सवाल
हुसैन यांनी रोहितच्या फलंदाजीचेही कौतुक केलं आणि सध्याच्या घडीतील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, असेही म्हणाले. ''तो मर्यादित षटकांचा ग्रेट फलंदाज आहे. जर तुम्ही ५० षटकांच्या क्रिकेटचा विचार केला, तर त्याच्या नावावर अनेक द्विशतकं आहेत. ट्वेंटी-२०त त्याने मध्ये लय गमावली होती, परंतु तो फॉर्मात परतला आहे. आयपीएल फायनलमध्ये सूर्यकुमार यादवसाठी मला विकेट फेकायला हवी होती, असं म्हणून त्यानं त्याच्यातला चांगल्या खेळाडूचे दर्शन घडवले,''असे म्हणून हुसैन यांनी पुन्हा रोहितच्या कर्णधारपदासाठी बॅटिंग केली.