Can Virat Kohli play IPL 2024? ( Marathi News ) - दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळणार का? हा प्रश्न सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB ) चाहत्यांना सतावतोय. महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी उत्सुकता व्यक्त केली. आयपीएल २०२४ च्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चपासून होणार आहे.
"क्या वो खेलेंगे... कुछ कारण के लिए खेल नहीं रहे हैं, शायद हो सकता है के, आयपीएल के लिए भी ना खेल ( तो खेळेल का? तो काही कारणास्तव खेळत नाही, कदाचित तो आयपीएलमध्ये खेळणार नाही.)," असे गावस्कर म्हणाले. रांची येथे एका कार्यक्रमात गावस्करांनी हे मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी ध्रुव जुरेल याचे कौतुक केले आणि आयपीएल २०२४ मध्ये तो राजस्थान रॉयल्ससाठी दमदार कामगिरी करेल, असे म्हटले. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ध्रुवने ९० व नाबाद ३९ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला आणि कारकीर्दितील दुसऱ्याच कसोटीत त्याने मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. "त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळू शकते. कसोटी सामन्यातील या कामगिरीनंतर जुरेल सुपरस्टार होऊ शकतो. अगदी आकाश दीपलाही आरसीबीमध्ये अधिक संधी मिळू शकेल आणि तो डेथ ओव्हर स्पेशालिस्टची भूमिका बजावू शकेल,''असे गावस्कर म्हणाले.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याच्या निर्णयाचे गावस्करांनी स्वागत केले. ते म्हणाले,"रोहितला फलंदाज म्हणून मुक्तपणे खेळण्याची परवानगी देण्यासाठी, हा निर्णय घेतला गेला आहे. रोहितसाठी हा व्यस्त हंगाम आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स खूप चांगले काम करेल. ''