मुंबई : महापौर चषक आंतरराष्ट्रीय मानांकन अ विभाग बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूचा इंटरनॅशनल मास्टर मुथय्याने (इलो २४२०) द्वितीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनाटोव्हला (इलो २६२४) बरोबरीत रोखले आणि फारुखला पहिल्या पटाच्या आसनावरून चौथ्या साखळी फेरीसाठी खाली आणले. परिणामी सलग तीन साखळी सामने जिंकणारा तृतीय मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानला (इलो २६१४) पुढील साखळी सामन्यात पहिल्या पटावर खेळण्याची संधी असेल. .
स्पर्धेच्या तिसऱ्यासाखळी सामन्यात पहिल्या पटावर तामिळनाडूच्या मुथय्या विरुद्ध ताजिकिस्तानच्या फारूक अमोनाटोव्ह यामध्ये लढत झाली. मुथय्याने किंग्स इंडियन पद्धतीने डावाची सुरुवात करून बचावात्मक पवित्रा आजमावत सावध खेळ केला. फारुखने त्याला अँटी किंग्स इंडियन पद्धतीचा वापर करत चोख प्रत्युत्तर देऊन चाहत्यांची वाहवा मिळवली. डावाच्या मध्यात दोघांनी वजीर आणि घोडे यांच्या साहाय्याने डावावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी वजीर वजिरी करत डाव बरोबरीत सोडवला.
दुसऱ्या पटावर जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानने भारताचा इंटरनॅशनल मास्टर हिमल गुसैनला (इलो २४०४ ) पराभूत करून विजयीदौड कायम राखली. तिसऱ्या व चौथ्या पटावर चुरशीच्या लढती झाल्या. पश्चिम बंगालच्या कौत्सव चॅटर्जीने (इलो २४०४) आर्मेनियाचा ग्रँडमास्टर सॅमवेलला (इलो २६११) तर महाराष्ट्राच्या फिडे मास्टर कृष्णतेर कुशाग्रने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर मिखाईलला (इलो २६०९) बरोबरीत रोखून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिसऱ्या साखळी फेरी अखेर जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानसह भारताचा ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्थी ( इलो २५५७), मुंबईचा इंटरनॅशनल मास्टर नूबेरशाह (इलो २४३६ ) आदी एकूण चौदा खेळाडू तीन गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.