Join us  

'माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता'; सचिनची लारासोबत अचानक टक्कर

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्वास फलंदाजी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला खेळाडू ब्रायन लारासमवेतचा फोटो सचिनने शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 7:31 PM

Open in App

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ज्याची जगभर ख्याती आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याचा चाहता वर्ग आहे. सचिन आज क्रिकेटपासून दूर गेला आहे, पण क्रिकेटपासून आणि क्रिकेट विश्वापासून त्याचं नाव कधीही दूर होऊ शकत नाही. सचिन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच सक्रीय असतो. कधी क्रिकेटच्या आठवणी शेअर करतो, तर कधी नवीन खेळाडूंनी प्रेरणा देतो. कुटुंबासमवेतही पिकनिक एन्जॉय करत असतो. तर, क्रिकेटमधील जुन्या मित्रांनाही टॅग करुन मजा घेत असतो. सचिने आता त्याच्या जिगरी मित्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्वास फलंदाजी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला खेळाडू ब्रायन लारासमवेतचा फोटो सचिनने शेअर केला आहे. सचिन आणि लारा दोघेही लंडनच्या रस्त्यावर चालत असतानाचे या फोटो दिसत आहेत. सचिनने पिवळा टी-शर्ट आणि जिन्स घातली असून लारानेही निळा टी-शर्ट आणि कॅज्युएल पँट घातल्याचे दिसून येते. दोघांचाही एकदम कॅज्युअल आणि सर्वसामान्यांप्रमाणे असणारा हा लूक पाहून नेटीझन्स जाम खुश झाले आहेत. काहींनी या जोडीला दोस्ती म्हणत कमेंट केल्या आहेत. तर, काहींनी दोघांचे लोकेशन कुठले आहे, असा प्रश्न केलाय. एका युजर्सने लोकेशन लंडनमधील रस्ता असल्याचेही सांगितले आहे. 

Casually bumped into another keen golfer today!आज अचानकपणे दुसऱ्या गोल्फरशी टक्कर झाली, असे कॅप्शन देत सचिनने स्माईलीचे इमोजीही शेअर केले आहे. नेटीझन्सला सचिन आणि लाराचा हा फोटो चांगलाच भावलाय. सचिनने या भेटीत लारा भारतात येण्याचं निमंत्रणही दिलं असेल. तर, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता, असंही सचिन त्याला म्हणाला असेल, अशा शब्दात वर्णन करता येईल, एवढा सहज हा दोन मित्रांचा फोटो दिसत आहे.

एक डावखुरा आणि आणि उजवा फलंदाज ज्यांनी जगभरातील क्रिकेटवर राज्य केलं. जगभरातील गोलंदाजांन मैदानावर धुतलं, ते लंडनच्या रस्त्यावर फिरताना पाहून चाहत्यांनाही नक्कीच आनंद झाला असेल. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरवेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघलंडन
Open in App