मुंबई : क्रिकेटपटू आणि राजकारण्यांच्या समावेशामुळे गेले काही दिवस गाजत असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीत अमोल काळे यांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे काळे यांनी चुरशीच्या लढतीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा २५ मतांनी पराभव केला. मुख्य पदाधिकाऱ्यांच्या सर्व जागांवर शरद पवार-आशिष शेलार गटाचे उमेदवार जिंकून आले. तसेच अपेक्स काऊन्सिल कमिटीच्या ९ पैकी ६ जागा जिंकत पवार-शेलार गटाने एमसीए निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखले.
काळे यांनी एकूण १८३ मते मिळवली, तर पाटील यांना १५८ मतांवर समाधान मानावे लागले. सचिवपदासाठी अजिंक्य नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व राखत सर्वाधिक २८६ मते मिळवली. एमसीए निवडणूक इतिहासामध्ये हा एक विक्रम ठरला. याआधी इतकी मते कोणत्याही पदासाठी मिळाली नव्हती. सचिवपदासाठी नाईक यांनी मयांक खांडवाला (३५) आणि नील सावंत (२०) यांचा एकतर्फी पराभव केला. खजिनदार पदासाठी अत्यंत अटीतटीची लढत रंगली.
यामध्ये अरमान मलिक यांनी अवघ्या एका मताने माजी खजिनदार जगदीश आचरेकर यांना १६२-१६१ असे नमवले. परंतु, केवळ एका मताचा फरक असल्याने पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही निकाल बदलला नाही. या पदासाठी तिसरे उमेदवार असलेले संजीव खानोलकर यांना केवळ १८ मते पडली. अपेक्स काऊन्सिल कमिटीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी सर्वाधिक २२१ मते मिळवली. त्याचप्रमाणे नीलेश भोसले (२१९), कौशिक गोडबोले (२०५), अभय हडप (२०५), सूरज समत (१७०), जितेंद्र आव्हाड (१६३), मंगेश साटम (१५७), संदीप विचारे (१५४) आणि प्रमोद यादव (१५२) यांनीही बाजी मारली.
यामध्ये केवळ हडप, गोडबोले आणि विचारे या संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट ग्रुपच्या उमेदवारांचा समावेश आहे. बाकी सर्व उमेदवार पवार-शेलार गटाचे आहेत. मुंबई प्रीमियर लीग परिषदेचे चेअर म्हणून विहंग सरनाईक यांची बिनविरोध निवड झाली. तसेच याच परिषदेच्या दुसऱ्या सदस्यपदासाठी गणेश अय्यर यांनी मौलिक मर्चंट यांचा २१३-१२३ असा दणदणीत पराभव केला. संयुक्त सचिवपदावर दीपक पाटील हेही बिनविरोध निवडून आले.
मांजरेकरांची संधी हुकलीमाजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना मतदान करता आले नाही. मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जवळ न बाळगल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे कळाले. यानंतर त्यांनी मतदानासाठी न येण्याचा निर्णय घेतला.
ठाकरेंची अनुपस्थिती : एमसीए निवडणुकीसाठी राजकारणातले विरोधक एकत्र आले खरे; मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदानासाठी उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे ठाकरेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
विरोधक आले होते एकत्र! या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांचे नेते एकत्र येऊन एकाच शरद पवार-आशिष शेलार गटातून लढले. राजकीय मैदानावर एकमेकांचे विरोधक असलेले हे नेते क्रिकेटसाठी एकमेकांचे समर्थक बनल्याने एमसीए निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
पाटील ठरले चौथे क्रिकेटपटूएमसीए अध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत होणारे संदीप पाटील चौथे क्रिकेटपटू ठरले. याआधी माधव मंत्री (१९९१, मनोहर जोशींविरुद्ध), अजित वाडेकर (२००१, शरद पवार यांच्याविरुद्ध) आणि दिलीप वेंगसरकर (२०११, विलासराव देशमुख यांच्याविरुद्ध) यांचाही अध्यक्षपदाच्या लढतीत पराभव झाला होता.