‘एमसीए’त शेलार गटाचा पराभव; दणदणीत विजयासह अजिंक्य नाईक नवे अध्यक्ष 

गेल्या महिन्यात अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 05:27 AM2024-07-24T05:27:08+5:302024-07-24T05:27:29+5:30

whatsapp join usJoin us
MCA got youth leadership; Ajinkya Naik new president with resounding victory  | ‘एमसीए’त शेलार गटाचा पराभव; दणदणीत विजयासह अजिंक्य नाईक नवे अध्यक्ष 

‘एमसीए’त शेलार गटाचा पराभव; दणदणीत विजयासह अजिंक्य नाईक नवे अध्यक्ष 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपूर्ण भारतीय क्रिकेटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘बीसीसीआय’ आणि ‘एमसीएचे’ माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्याने अजिंक्य नाईक यांनी तब्बल १०७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या गटाच्या संजय नाईक यांचा पराभव केला.

गेल्या महिन्यात अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. यावेळी, एकूण ३७३ पात्र मतदारांपैकी ३३५ मतदारांनी 
मतदान केले. 

यामध्ये अजिंक्य यांनी २२१ मते मिळवली, तर संजय यांना केवळ ११४ मते पडली. यासह ३७ वर्षीय अजिंक्य यांनी ‘एमसीए’चा सर्वांत युवा अध्यक्ष बनण्याचा मान मिळवला. अजिंक्य यांनी विजय मिळवल्यानंतर सांगितले की, ‘मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही दु:खाच्या  वातावरणातील निवडणूक आहे. त्यामुळे हा विजय अमोल काळे यांचा आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी मी लढलो. ज्येष्ठ नेते शरद पवारांसह इतर पक्षांतील नेत्यांचेही आभार मानतो. मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्न करीन. रणजी चषक आणि भारतीय संघासाठी खेळाडू निर्माण करण्याचा आमचा प्रमुख उद्देश आहे.’

या मान्यवरांची उपस्थिती ठरली विशेष 
झहिर खान, अजित आगरकर, सुरु नायक, मिलिंद रेगे, डायना एडुल्जी, रमेश पोवार, करसन घावरी, जतिन परांजपे, सलील अंकोला, ॲबी कुरुव्हिल्ला, सुलक्षणा नाईक, संजय मांजरेकर, बलविंदर संधू, पारस म्हांब्रे या माजी क्रिकेटपटूंसह माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे, राजकीय क्षेत्रातून मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. आशिष शेलार, आ. आदित्य ठाकरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. क्षितिज ठाकूर, आ. मिलिंद नार्वेकर, आ. प्रसाद लाड, आ. प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित हाेते. 

...हे मतदानाला अनुपस्थित
सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मतदानाला अनुपस्थित हाेते.

Web Title: MCA got youth leadership; Ajinkya Naik new president with resounding victory 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.