Join us  

रिकाम्या स्टेडियममुळे ‘एमसीए’चे बुडाले ९ कोटी; कोरोना निर्बंधामुळे बसला आर्थिक फटका

या स्टेडियमवर आजवर खेळल्या गेलेल्या चारपैकी दोन सामन्यांत भारताने विजय मिळवला असून दोन सामने गमावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 3:39 AM

Open in App

सुकृत करंदीकरपुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना खेळली जाणार आहे. त्यामुळे ‘एमसीए’ला सुमारे नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

एमसीए मैदानाची प्रेक्षकक्षमता २८ हजार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकीट विक्रीतून एका सामन्याला तीन-साडेतीन कोटी रुपये एमसीएला मिळतात. मात्र यंदा कोरोना साथीमुळे प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने ‘एमसीए’ला दिली.‘एमसीए’चे अध्यक्ष विकास काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘सामन्यांच्या आयोजनातून प्रामुख्याने तीन प्रकारे उत्पन्न मिळते. एक असते तिकीटविक्री. मात्र यंदा तो पर्याय बाद झाला आहे. दुसरा पर्याय म्हणजे मैदानातील जाहिरातींद्वारे हे उत्पन्न मिळते. एका सामन्यात या माध्यमातून तीन कोटी रुपये याप्रमाणे तीन सामन्यांचे नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. सामन्याच्या आयोजनासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्थानिक संघटनेला ठरावीक रक्कम देते. यातून एमसीएला साडेचार कोटी रुपये मिळतील.’शून्य प्रेक्षकसंख्येमुळे थेट नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानापेक्षाही पुणेकर सामन्याच्या आनंदाला मुकणार हे मोठे नुकसान आहे. यापूर्वी ‘एमसीए’ने अगदी तीनशे रुपयांपासून तिकिटे उपलब्ध करून दिली. शालेय विद्यार्थ्यांना अत्यल्प, तर काही वेळा विनामूल्य सामन्यांचा आनंद लुटू दिला. 

या स्टेडियमवर आजवर खेळल्या गेलेल्या चारपैकी दोन सामन्यांत भारताने विजय मिळवला असून दोन सामने गमावले आहेत. येथे याआधी २७ ऑक्टोबर २०१८ रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा एकदिवसीय सामना झाला असून त्यात भारताचा ४३ धावांनी पराभव झाला होता.

एवढा येतो खर्चप्रेक्षकांविना खेळल्या जाणाऱ्या एका एकदिवसीय सामन्याच्या आयोजनासाठी ७० ते ८० लाख रुपये खर्च येतो. एरवी स्टेडियम प्रेक्षकांनी भरलेले असेल तर हाच खर्च दोन कोटी रुपयांच्या घरात जातो. यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेचा असतो. मात्र एका सामन्यामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो. ‘एमसीए’ला तिकीट विक्रीतून काहीच उत्पन्न मिळणार नसले तरी अन्य उत्पन्न सुमारे बारा-तेरा कोटींपर्यंत जाईल.- विकास काकतकर, अध्यक्ष, एमसीए 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या