मुंबई - अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघाने चौथ्यांदा विश्चचषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचा चौकारच लगावला आहे. दरम्यान भारतीय संघाची धूरा सांभाळणा-या मुंबईकर पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने पृथ्वी शॉला 25 लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे याआधी बीसीसीआयनेही भारतीय संघातील खेळाडूंसाठी 30 लाखांची बक्षिस रक्कम जाहीर केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केलं/ की, 'विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शॉ याला मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!'
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन चौथ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरणा-या अंडर -19 भारतीय संघासाठी बीसीसीआयने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. भारताच्या अंडर-19 संघाला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बक्षिसापोटी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला 30 लाख रुपये मिळणार आहेत. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 20 लाख रुपये जाहीर झाले आहेत. डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला.
फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले.
खेळाच्या एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या.