इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं सर्वाधिक 15.50 रक्कम मिळवली. त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं आपल्या ताफ्यात करून घेतलं. त्यापाठोपाठ ऑसींच्या ग्लेन मॅक्सवेलला भाव मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याला 10.75 कोटींत आपल्या संघात घेतलं. मानसिक तणावाच्या कारणास्तव ग्लेन मॅक्सवेलनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहणं पसंत केलं होतं. त्यामुळे आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागणार नाही असाही अंदाज व्यक्त केला जात होता. पण, त्याच्यासाठी सर्व संघांमध्ये चांगली चुरस रंगली आणि पंजाबनं बाजी मारली.
आयपीएलमध्ये पुन्हा पंजाबकडून खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या मॅक्सवेलनं शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये तुफानी खेळी केली. मेलबर्न स्टार संघाचे कर्णधारपद भूषविताना मॅक्सवेलनं 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मॅक्सवेलनं सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानं 39 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 83 धावा चोपल्या. त्याच्या याच फटकेबाजीच्या जोरावर मेलबर्न स्टार संघानं 7 बाद 167 धावा केल्या.