India vs Bangladesh ODI series : भारतीय संघाला वन डे मालिकेत बांगलादेशकडून सलग दोन पराभव पत्करावे लागले. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर चहुबाजूने टीका होत आहे. न्यूझीलंडपाठोपाठ भारताने बांगलादेशविरुद्धची वन डे मालिका गमावली. न्यूझीलंडविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका १-० अशी गमावली होती, या मालिकेत पावसाने व्यत्यय आणला अन्यथा भारताचा आणखी दारुण पराभव झाला होता.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंच्या खराब फॉर्मची दखल घेत, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य, मदन लाल यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. खेळाडूंमध्ये तीव्रता आणि उत्कटतेचा अभाव आहे. संघाची वाटचाल चुकीच्या दिशेने चालली आहे, असे ते म्हणाले. " भारतीय संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू नाही. संघात पॅशन दिसत नाही. गेल्या काही वर्षांत मला त्यांच्यात 'जोश' दिसला नाही. देशासाठी खेळण्याची त्यांची आवड गायब झाली आहे. एकतर त्यांचे शरीर खूप थकले आहे किंवा ते फक्त हालचाली करत आहेत आणि ही गंभीर चिंतेची बाब आहे."
७१ वर्षीय मदन लाल यांनी भारतीय फलंदाजांवर कठोर टीका केली आहे आणि अलीकडच्या काळात संघाच्या सामान्य प्रदर्शनासाठी त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना जबाबदार धरले."तुम्ही रेकॉर्ड पाहिल्यास, गेल्या तीन वर्षांत वरिष्ठ खेळाडूंनी किती शतके झळकावली आहेत? आणि गेल्या एका वर्षात किती? वयाच्या कारणामुळे तुमच्या हाताचा व डोळ्यांचा समन्वय मंदावतोय. पण ते अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी करायला हवी होती. जर तुमच्या टॉप ऑर्डरने कामगिरी केली नाही तर तुम्ही जिंकणार नाही,''असेही मदन लाल म्हणाले.
माजी क्रिकेटपटूंचे असेही मत आहे,की भारताने इतर संघांकडून शिकले पाहिजे आणि वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे खेळाडू निवडून प्रयोग करायला हवा. प्रत्येक देश असे खेळत आहे. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी स्पेशलाइज्ड क्रिकेटपटू असले पाहिजेत. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे खेळाडू का नसावेत? सर्व देश हे करत आहेत आणि भारतानेही तेच करायला हवे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"