पर्थ : टी-20 विश्वचषकात रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना पार पडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक साजरी करण्याची संधी रोहित अँड टीमला होती. पण, फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही. सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने कशातरी १३३ धावांपर्यंत मजल मारली. पण, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांनी घात केला. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जवळपास धुळीस मिळाल्या. भारतीय संघाच्या पराभवाने पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर केले आहे. यावरूनच आता चाहते भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल (९) , रोहित शर्मा (१५), विराट कोहली (१२) , दीपक हुडा (०) व हार्दिक पांड्या (2) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्यकुमारच्या ६८ ( ४०) धावा, अन्य फलंदाजांनी मिळून ५७ (८०) धावा केल्या. सूर्यकुमार व दिनेश कार्तिक यांनी ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला आणि भारताला ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.
दक्षिण आफ्रिकेचा विजय 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची देखील सुरूवात निराशाजनक झाली. मात्र डेव्हिड मिलरने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या पराभवासोबतच पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि एडन मार्करम यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर मोहम्मद शमी, आर अश्विन आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. खरं तर भारतीय संघाने जाणूनबुजून हा सामना गमावला असल्याचे काही चाहते म्हणत आहेत.
भारताच्या पराभवाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाच्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कालच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने 5 गुणांसह ग्रुप बीच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे, तर भारत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र पाकिस्तानचा संघ 2 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणे पाकिस्तानसाठी फायदेशीर होते पण तसे झाले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"