टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील आवडत्या मेलबोर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) संस्मरणीय व समाधान देणाऱ्या विजयाची नोंद केली. ॲडिलडेमधील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने विजय नोंदवत त्या धक्क्यातून सावरल्याचे सिद्ध केले. त्याचे श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्री व सपोर्ट स्टाफला द्यायला हवे. ३६ धावांत गारद झाल्यानंतरही संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.
दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाचा डाव १९५ धावांत गुंडाळत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. विराटविना खेळणाऱ्या संघाचा कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजांचा कुशलतेने वापर केला आणि अपारंपरिक क्षेत्ररक्षण सजवले आणि त्याचा संघाला लाभही झाला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मार्नस लाबुशेन सिराजच्या गोलंदाजीवर लेग गलीला झेलबाद झाल्याचे सांगता येईल. ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजीची भिस्त स्टीव्ह स्मिथवर अवलंबून असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. पहिल्या कसोटीत स्मिथविरुद्ध वर्चस्व गाजवणाऱ्या अश्विनने मेलबोर्नमध्येही त्याला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. उपखंडाबाहेर अश्विनची ही कामगिरी सुरेख आहे.
मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले, ही निराशाजनक बाब आहे, पण रहाणेने उल्लेखनीय कामगिरी करीत त्यांचे अपयश जाणवू दिले नाही. लॉर्ड्सवर २०१४ प्रमाणे त्याने येथेही विजयाची मजबूत पायाभरणी केली. ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्यासोबत उपयुक्त भागीदारी करीत रहाणेने भारताला तीनशेचा पल्ला ओलांडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांनी प्रभावित केले. पदार्पणाचे त्यांच्यावर कुठलेही दडपण दिसले नाही आणि ते संघात एकदम फिट बसले. सर्वोत्तम फलंदाज व अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात नसताना भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यावरून बेंच स्ट्रेंथची कल्पना येते. यात ईशांत शर्मा व रोहित शर्मा नसतानाही संघ पंगू झाला आहे, असे जाणवले नाही.