कोलंबो : कुशल मेंडिसची शतकी खेळी, तसेच सलामीवीर दिमुथ करुणारत्नेसोबत त्याने दुसºया गड्यासाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने फॉलोआॅननंतर दुसरा डाव सावरला. भारताविरुद्ध दुसºया कसोटीच्या तिसºया दिवसअखेर २ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा उभारल्या आहेत.
मेंडिसने १३५ चेंडूंत १७ चौकारांसह ११० धावांचे योगदान दिले. करुणारत्ने ९२ धावांवर नाबाद असून, या दोघांनी दुसºया गड्यासाठी १९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारा दोन धावांवर नाबाद होता. भारताच्या तुलनेत पहिल्या डावात ४३९ धावांनी माघारलेला लंका संघ अद्याप २३० धावांनी मागे असून, त्यांचे आठ फलंदाज शिल्लक आहेत.
भारताने पहिला डाव ९ बाद ६२२ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात लंकेचा पहिला डाव १८३
धावांत गडगडला. रविचंद्रन
आश्विन याने ६९ धावांत पाच फलंदाज बाद केले. डावात पाच गडी बाद करण्याची आश्विनची ही २६ वी वेळ होती.
दुसºया डावात सलामीचा उपूल थरंगा (२) लवकर बाद झाल्यानंतर करुणारत्ने- मेंडिस यांनी धावसंख्येला आकार दिला. आश्विन-जडेजा यांना ही जोडी जुमानत नव्हती. ५२ षटके दोघांनी खेळून काढली. त्याआधी एका धावेवर असताना आश्विनच्या चेंडूवर मेंडिसचा मिडॉनवर धवनने झेल सोडला होता. या जोडीने २४ व्या षटकात संघाचे शतक गाठले. जडेजाच्या चेंडूवर वृद्धिमान साहाने मेंडिसचा झेल टिपला तेव्हा डीआरएसमध्ये मैदानी पंचांचा निर्णय तिसºया पंचांनी फेटाळला.
चहापानानंतरही भारतीय गोलंदाजांना झुंजावे लागले. कोहलीने यानंतर हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपविला. त्याने अचूक मारा करीत मेंडिसला साहाकडे झेल देण्यास बाध्य करीत ही जोडी फोडली. त्यानंतर करुणारत्ने याने जडेजाला चौकार ठोकून संघाच्या २०० धावा पूर्ण केल्या. त्याआधी, कालच्या २ बाद ५० वरून पहिल्या डावाला पुढे सुरुवात करणाºया यजमान संघाने फिरकीपटूंपुढे नांगी टाकली. ४९.४ षटकांत त्यांचा पहिला डाव आटोपताच, भारताने ४३९ धावांची कसोटीतील तिसरी सर्वाधिक आघाडी मिळविली. लंकेचे सहा फलंदाज केवळ ६६ धावांत बाद झाले. निरोशन डिकवेला याने सर्वाधिक ५१ धावा केल्या. (वृत्तसंस्था)
धावफलक...
भारत पहिला डाव : ९ बाद ६२२ (डाव घोषित).
श्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. आश्विन २५, उपुल थरंगा झे. राहुल गो. आश्विन ००, कुशल मेंडिस झे. कोहली गो. उमेश २४, दिनेश चंडीमल झे. पांड्या गो. जडेजा १०, अँजेलो मॅथ्यूज झे. पुजारा गो. आश्विन २६, निरोशन डिकवेला त्रि. गो. शमी ५१, धनंजय डिसिल्वा त्रि. गो. जडेजा ००, दिलरुवान परेरा त्रि. गो. आश्विन २५, रंगना हेराथ त्रि. गो. शमी ०२, मलिंदा पुष्पकुमारा नाबाद १५, नुवान प्रदीप त्रि. गो. आश्विन ००. अवांतर (५). एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद १८३. गोलंदाजी : शमी ६-१-१३-२, आश्विन १६.४-३-६९-५, जडेजा २२-६-८४-२, उमेश ५-१-१२-१.
श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने खेळत आहे ९२, उपूल थरंगा त्रि.गो. उमेश ०२, कुशल मेंडिस झे. साहा गो. पांड्या ११०, मलिंदा पुष्पकुमारा खेळत आहे ०२. अवांतर (३). एकूण : ६० षटकांत २ बाद २०९. गोलंदाजी : उमेश ९-२-२९-१, आश्विन २४-६-७९-०, शमी ६-२-१३-०, जडेजा १६-२-७६-०, पांड्या ५-०-१२-१.
Web Title: Mendis scored 209 runs for the second time after the follow-on of Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.