- विनय उपासनी (मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)गेल्या रविवारी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या २४० धावा फलकावर लागल्यानंतर अनेकांनी खांदे पाडले. अपेक्षेप्रमाणेच झाले. कांगारूंनी अगदी आरामात हा सामना जिंकत खेळाडूंसह करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत थाटात धडक मारणारा भारतीय संघ नेमका अंतिम सामन्यातच कच खातो, हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले. आता या पराभवाची कारणमीमांसा करताना कदाचित खेळाडूंच्या मनात अंतिम सामन्यात पराभूत होण्याच्या भीतीचा तोच बागुलबुवा असावा, असे म्हटले जात आहे. यालाच म्हणतात मेंटल फिल्टरिंग...
हजार सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ एक-दोन नकारात्मक गोष्टींकडे मन अधिक केंद्रित होणे म्हणजे मेंटल फिल्टरिंग. संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. मात्र, मोक्याच्या क्षणी गारद झाला. कारण अंतिम सामन्यात पराभूत होण्याचा पूर्वेतिहास खेळाडूंच्या मनात घर करून बसला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बहुदा ते तिथेच अडकले असावेत, असे म्हणायला वाव आहे. असो. दैनंदिन जीवनात असेच घडते.
ऑफिसात डझनभर चांगली कामे केली असतील, परंतु बॉसने नेमके एखाद्या चुकीकडे लक्ष वेधले तर अनेकांचे मन उदास होते. आणि पुढे तीच गोष्ट ठसठसत राहते. त्यामुळे सकारात्मक बाबींकडे मन सोयीस्कर दुर्लक्ष करून नकारात्मक गोष्टींबाबत अधिक जागरूक होते, हेच ते मेंटल फिल्टरिंग. मी कोणाला आवडत नाही, माझ्या हातून नेहमीच चुका होणार, जग खूप वाईट आहे... या व अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी मन भरून राहणे ही मेंटल फिल्टरिंगची अवस्था आहे.
मनाच्या या नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करण्यासाठी सकारात्मक बाबींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. वस्तुत: आपल्याकडे मन या विषयावर कितीतरी साहित्य उपलब्ध आहे. थोर कवयित्री बहिणाबाईंनी तर आपल्या कवितेतून मनाला कितीतरी उपमा दिल्या आहेत. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक दिले आहेत. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’.. असं संत तुकाराम सांगून गेले आहेत. त्यामुळेच मनाचं फिल्टरिंग सकारात्मक बाबींनी होणं केव्हाही गरजेचं. मानसिक स्वास्थ्य हेच निरोगीपणाचे लक्षण...