लखनौ सुपर जायंट्ससोबत दोन वर्ष मेंटॉर म्हणून काम केल्यानंतर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) त्याच भूमिकेत आता कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) ताफ्यात दाखल झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये भारताचा माजी सलामीवीराने KKR चा मार्गदर्शक म्हणून सूत्रे स्वीकारली. गौतम गंभीरने दोनवेळा कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद जिंकून दिले आहेत. त्यामुळे तो पुन्हा KKR च्या ताफ्यात आल्याने यंदा चाहत्यांना जेतेपदाची अपेक्षा आहे. त्याचेवळी गंभीरने खेळाडूंसोबतच्या पहिल्याच भेटीत त्यांची ऊर्जा वाढवणारे स्पीच दिले आणि अप्रत्यक्षपणे IPL 2024 Final ची तारीखही सांगून टाकली.
बीसीसीआयने आयपीएल २०२४च्या पहिल्या २१ सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर केले आहे. २२ मार्च ते ७ एप्रिल या दोन आठवड्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आणि लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाईल.
हाती आलेल्या वृत्तानुसार आयपीएलचा दुसरा टप्पा युएई मध्ये खेळवला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रशिक्षणापूर्वी खेळाडूंसह त्याच्या पहिल्या सामूहिक बैठकीत KKR संघाला संबोधित करताना, गंभीरने "26 मे रोजी, आम्ही तिथे असू" असा उल्लेख केला, जो या आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या तारखेकडे निर्देश करतो. "२६ मे रोजी, आपण तिथे असायला हवे. शक्य ते सर्व काही देऊया आणि त्याची सुरुवात आजपासून होत आहे. म्हणून जर आपण त्याच मार्गावर चाललो आणि झुंज दिली तर मला खात्री आहे की आपण खूप यश मिळवू." असे गौतम गंभीरने खेळाडूंना म्हटले. KKR ने सोशल मीडियावर Video शेअर केला आहे.
कठोर प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळाडूला समान वागणूक मिळावी यावर भर देताना गंभीर पुढे म्हणाला, "आम्ही आजपासून सीझनची सुरुवात करत आहोत. त्यामुळे सर्वस्व पणाला लावा. ही एक अतिशय अभिमानास्पद फ्रँचायझी आहे. तुम्ही खूप यशस्वी फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करत आहात. खेळाडूंना सर्व स्वातंत्र्य देणे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संघातील प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल. इथे कोणीही वरिष्ठ किंवा ज्युनियर, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय नाही, कारण आपले ध्येय एकच आहे. ते म्हणजे आयपीएल जिंकणे,''असेही त्याने म्हटले.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल जिंकली होती.