मुंबई : मीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर आहे. पण हे वादळ आता भारतातील क्रिकेटमध्येही येऊन धडकले आहे. कारण बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. लैंगिक छळाच्या आरोपामुळे जोहरी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्या जागी बीसीसीआयचे कार्यवाह सचिव अमिताभ चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी जोहरी यांनी केलेली मुदतवाढीची मागणीही प्रशासकीय समितीने फेटाळून लावली आहे. सिंगापूर येथे 16 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत आयसीसीची बैठक होणार आहे. त्याबाबत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले की,'' राहुल यांनी स्पष्टीकरणासाठी 14 दिवसांची मुदत मागितली होती. या प्रकरणाबाबत ते त्यांच्या कायदा सल्लागारांशी चर्चा करत आहेत आणि त्यांना आयसीसीच्या बैठकीलाही उपस्थित राहायचे होते. त्यामुळे त्यांनी मुदत मागितली होती. त्याची ही मागणी फेटाळण्यात आली आहे.''
बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी जोहरी हे डिस्कवरी नेटवर्क एशिया पॅसिफिक (दक्षिण एशिया) चे कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी नोकरी देण्याचे आमीष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला होता.