इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आणखी एक लीगमध्ये आपला संघ उतरवला आहे. MI New York नावाचा फ्रँचायझीचा संघ आगामी MLC 2023 लीगमध्ये खेळणार आहे आणि त्याच्या संघाची व प्रशिक्षक स्टाफची घोषणा करण्यात आली आहे. MI ने जाहीर केलेल्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ट व कागिसो रबाडा हे स्टार खेळाडू आहेत. त्यांनी या लीगसाठी निकोलस पूरन, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस व जेसन बेहरेनडॉर्फ यांनाही करारबद्ध केले आहे. तीन आठवडे डल्लास येथे ही लीग खेळवली जाणार असून संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवले गेले आहे. डेव्हिड व्हिजे या अष्टपैलू खेळाडूचाही संघात समावेश आहे.
राशीद आणि रबाडासाठी MI फ्रँचायझी अंतर्गत हा दुसरा संघ असेल. या दोघांनी यापूर्वी SA20 मध्ये MI केपटाऊनचे प्रतिनिधित्व केले होते. पूरन आणि बोल्ट हेही यापूर्वी UAE मध्ये ILT20 स्पर्धेत MI Emirates कडून खेळले होते. डेव्हिड आणि ब्रेव्हिससाठी, ही तिसरी (IPL आणि SA20 व्यतिरिक्त) MI फ्रँचायझी आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू रॉबिन पीटरसन यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. जे अरुणकुमार आणि जेम्स पॅमेंट हे अनुक्रमे फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, तरुणाई, अनुभव आणि सामर्थ्य यांचा हा एक विलक्षण समूह आहे. आमच्याकडे टिम डेव्हिड आणि ब्रेव्हिस यांच्या रूपात रोमांचक प्रतिभा आहे, तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि डेव्हिड विसे हे परफॉर्मर आहेत. आमच्या स्थानिक यूएस खेळाडूंच्या अपवादात्मक कौशल्यांसह, आम्हाला विश्वास आहे की MI न्यूयॉर्क स्पर्धेत वर्चस्व गाजवेल.
न्यूयॉर्क फ्रँचायझीने यूएसएचा विद्यमान कर्णधार मोनांक पटेल आणि यूएसएचा माजी कर्णधार स्टीव्हन टेलर यांची निवड केली आहे. ऑलराउंडर नॉथुश केंजिगे, यष्टिरक्षक शायन जहांगीर आणि वेगवान गोलंदाज काइल फिलिप हेही संघात आहेत. सहा संघांची MLC लीग १३ जुलैपासून सुरू होत आहे. LA नाइट रायडर्सने आंद्रे रसेल, सुनील नरेन, जेसन रॉय आणि लॉकी फर्ग्युसन यांना स्पर्धेसाठी त्यांचे विदेशी खेळाडू म्हणून घोषित केले होते.