MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांना निम्मा संघ तंबूत परतला होता. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंजांची लय भारी कामगिरी करताना CSKच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. चेन्नई सुपर किंग्सनं IPLमधील सर्वाच निचांक धावसंख्येचा विक्रम टाळला असला तरी त्यांना समाधानकारक खेळ करता आला नाही. सॅम कुरननं ( Sam Curran) एकहाती खिंड लढवताना संघाची लाज वाचवली. त्यानं अर्धशतकी खेळी केली.
करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू ( २) व नटराजन ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती. ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी या जोडीवरच CSK फॅन्सचा भरवसा होता, परंतु बोल्टनं जडेजाला बाद करून त्यांची कोंडी केली.
चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा निम्मा संघ पहिल्या पॉवर प्लेमध्ये तंबूत परतला आहे. धोनीनं सातव्या षटकात खणखणीत षटकार मारून आशेचा किरण दाखवला, परंतु राहुल चहरनं चतुराईनं पुढच्याच चेंडूवर धोनीला ( १६) माघारी जाण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्सचे ७ फलंदाज ४३ धावांत माघारी परतले होते. सॅम कुरननं एक खणखणीत षटकार खेचून चेन्नईला अर्धशतकी पल्ला ओलांडून दिला. कुरन आणि शार्दूल ठाकूर यांची २८ धावांची भागीदारी नॅथन कोल्टर-नायलनं संपुष्टात आणली. ठाकूर ११ धावांवर माघारी परतला.
जसप्रीत बुमराह ( २/२५), राहुल चहर ( २/२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टर नायलनं एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ( ४/१८) विकेट्स घेतल्या. सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि त्या जोरावर चेन्नईला ९ बाद ११४ धावा करता आल्या.