MI vs DC IPL 2024 | मुंबई: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील विसावा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. यजमान मुंबईचा संघ आपल्या पहिल्या विजयाचा शोधात आहे. (MI vs DC) मुंबईला आपल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आजचा दिल्लीविरूद्धचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ देखील संघर्ष करत आहे. (IPL 2024 News)
मुंबई आणि दिल्ली यांच्यातील लढतीला सुरुवात होण्यापूर्वी सराव सत्रादरम्यान दोन्हीही संघातील खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला फलंदाजीचे धडे देताना दिसला. पंत आणि सचिनच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीच्या फ्रँचायझीने एक मराठी गाण्याचा आस्वाद देत सचिनबद्दल असलेले प्रेम दाखवून दिले. 'जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली', या चारोळ्या या भेटीच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
दिल्ली आणि मुंबई दोन्हीही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्लीला १ सामना जिंकण्यात यश आले तर मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. पंतच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. दिल्ली आताच्या घडीला नवव्या तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला.