MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीच्या संघात असलेले मुंबईकर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी MIच्या गोलंदाजांचा सामना केला. गब्बरनं अर्धशतकी खेळी करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनं अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व अॅलेक्स केरी यांना स्थान दिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीला साजेशी सुरुवात करता आली नाही. ट्रेंट बोल्टनं तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ ( ४) याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) खेळपट्टीवर आला. त्याने काही सुरेख फटके मारताना क्लास दाखवला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणेला पाचव्या षटकात कृणाल पांड्यानं १५ धावांवर पायचीत केलं. त्यानंतर शिखऱ धवननं दोन विक्रम केले. IPLमध्ये त्यानं शंभर षटकार खेचले आणि दिल्लीकडून १००० धावा पूर्ण केल्या. अजिंक्यनेही खास विक्रम केला. ट्वेंटी-20त त्यानं ५००० धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला.
शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्यानं दिल्लीला आणखी एक धक्का देत अय्यरला ( ४२) बाद केले. धवननं ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. धवनचे हे IPLमधील ३८वे अर्धशतक ठरले आणि त्यानं सुरेश रैना, रोहित शर्मा व विराट कोहली ( प्रत्येकी ३८ अर्धशतकं ) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. धवनने ५२ चेंडूंत १ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. दिल्लीनं २० षटकांत ४ बाद १६२ धावा केल्या.