MI vs GT: आयपीएल 2023 चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे आणि प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. आज मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये सामना होत आहे. मुंबईसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. या दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक नवीन मुद्दा छेडला आहे, ज्याचे पडसाद आयपीएलनंतर उमटू शकतात.
आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार आहे. या दोघांची टक्कर म्हणजे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची टक्कर. भारतीय संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधारामध्ये हा सामना होत आहे. सध्या रोहित शर्मा अधिकृतपणे कर्णधार असला तरी भविष्यात हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी जाणार असल्याची चर्चा आहे.
हार्दिकने T20 चे नेतृत्व करावेटीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी मात्र आयपीएल संपण्यापूर्वीच हा मुद्दा उपस्थित केला. मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्यापूर्वी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या भवितव्याबाबत बोलताना कर्णधारपदावर आपले मत मांडले. ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले की, आता हार्दिक पांड्याकडे टी-20 मध्ये टीम इंडियाची जबाबदारी सोपवली जावी.
2007 चा फॉर्म्युला पुन्हा दिसेल का?गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्या हा तात्पुरता कर्णधार म्हणून T20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहे. शास्त्री यांचे मत आहे की, हाच मार्ग पुढे जावा आणि 2024 च्या T20 विश्वचषकासाठी त्याने टीम इंडियाचे नेतृत्व करावे. 16 वर्षांपूर्वीच्या 2007 टी-20 विश्वचषकाप्रमाणे टीम इंडिया 2024 मध्येही नवीन खेळाडूंना मैदानात उतरवेल, असा विश्वास माजी भारतीय प्रशिक्षकाला आहे.