Join us  

MI vs GT, IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय!

मुंबईकडून सूर्यकुमारने झळकावले शतक, सामनाही जिंकला पण चर्चा झाली ती राशिद खानच्या तुफानी खेळीची...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:33 PM

Open in App

Rashid Khan, Suryakumar Yadav, IPL 2023 MI vs GT Live:सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने IPL च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 219 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 191 धावा करू शकला. गुजरातकडून राशिद खानने अर्धशतक झळकावले. त्याने सर्वाधिक 79 धावा काढल्या. याशिवाय डेव्हिड मिलर 41 आणि विजय शंकर 29 धावा काढू शकले. पण अखेर मुंबईचा २७ धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून आकाश मधवालने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 

पॉवरप्लेमध्ये GT ने 3 गडी गमावले!

219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. संघाने दुसऱ्याच षटकात ऋद्धिमान साहाची विकेट गमावली. कर्णधार हार्दिक पंड्याही तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. चौथ्या षटकात सलामीवीर शुभमन गिलला आकाश मधवालने क्लीन बोल्ड केले. संघाला 6 षटकांत 3 गडी गमावून 48 धावाच करता आल्या.

यानंतर एक एक करत 8 विकेट पडल्या. एक वेळ अशी होती की, गुजरातचा संघ 150 धावांच्या आत ऑल आउट होईल अशी अपेक्षा होती, पण राशिद खानने एक बाजू मजबूत सांभाळली. त्याने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जिथे मुंबईला लवकर सामना संपवायचा होता, तिथे राशिदने अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. त्याने 32 बॉलमध्ये सर्वाधिक 79 धावा केल्या.

सूर्याचे दमदार शतक

वानखेडे स्टेडियमवर गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या पहिल्या आयपीएल शतकाच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 5 बाद 218 धावा केल्या. सूर्यकुमारने 49 चेंडूत 103 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने शतक पूर्ण केले. त्याने विष्णू विनोदसोबत 42 चेंडूत 65 आणि कॅमेरून ग्रीनसोबत 18 चेंडूत 54 धावांची नाबाद भागीदारी केली. ग्रीनसोबत भागीदारी करताना सूर्याने 15 चेंडूत 50 धावा केल्या.

राशीदने 4 बळी घेतले

गुजरात टायटन्सला पॉवरप्लेमध्ये एकही बळी घेता आला नाही, पण 7व्या षटकात राशीद खानने संघाला दोन यश मिळवून दिले. त्याने डावाच्या 7व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनला आउट केले. यानंतर नेहल वढेरा आणि टीम टेव्हिडलाही त्याने माघारी पाठवले. 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स
Open in App