Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील सर्वात खतरनाक, सैराट, लाजवाब अशी खेळी म्हणून आजची पॅट कमिन्सची ( Pat Cummins) फटकेबाजी ओळखली जाईल. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स हे तगडे फलंदाज माघारी परतले असताना तो वादळासारखा मैदानावर उतरला अन् मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. IPL 2022मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने आज आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- मुंबई इंडियन्सच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा निम्मा संघ १०१ धावांवर माघारी परतला होता. कोलकाताला अखेरच्या ३० चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि कमिन्सने ६ चेंडूंत त्या धावा केल्या आणि कोलकाताला ५ विकेट्स व २४ चेंडू राखून विजय मिळवून दिला. डॅनिएल सॅम्सने टाकलेल्या १६व्या षटकात कमिन्सने ३५ धावा कुटल्या. आयपीएल इतिहासातील हे सर्वात महागडे १६वे षटक ठरले.
- आयपीएल मधील ही स्ट्राईक रेटच्या दृष्टीनेही अव्वल खेळी ठरली. पॅट कमिन्सने ३७३.३३ च्या स्ट्राईक रेटने आज धावा केल्या. त्याने सुरेश रैनाचा ३४८च्या स्ट्राईक रेटचा ( वि. पंजाब किंग्स, २०१४) विक्रम मोडला. युसूफ पठाण ( ३२७.२७ स्ट्राईक रेट वि. सनरायझर्स हैदराबाद, २०१४) आणि लोकेश राहुल ( ३१८.७५ स्ट्राईक रेट वि. दिल्ली कॅपिटल्स, २०१८ ) यांनीही अशी आतषबाजी केली होती.
- आयपीएलमधील हे सर्वात जलद ( १४ चेंडू) अर्धशतक झळकावण्याच्या लोकेश राहुलच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. लोकेशने २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. १५ चेंडूंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कमिन्सने आज नावावर केला. त्याने १५ चेंडूंत नाबाद ५६ धावा करताना रोहित शर्माचा २०१५ सालचा ४२ धावांचा विक्रम मोडला.
पाहा व्हिडीओ..