Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सनी पराभवाची हॅटट्रिक साजरी केली. पाकिस्तान दौऱ्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या पॅट कमिन्सने ( Pat Cummins) पहिल्याच आयपीएल सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि १४ चेंडूंत अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने १६ षटकातच सामना जिंकला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण, अजिंक्य रहाणेने कॅच सोडून जीवदान दिलेल्या तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावा चोपल्या. उमेश यादवने तिसऱ्या षटकात चतुराईने रोहित शर्माची विकेट घेतली. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले. १३व्या षटकात तिलक वर्माला जीवदान मिळाले. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. ५व्या षटकात टायमल मिल्सने टाकलेला चेंडू अजिंक्यने भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो डॅनिएल सॅम्सने टीपला. अजिंक्य ७ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने चौकाराने सुरुवात केली, परंतु मुंबई इंडियन्सने रणनीती आखून त्याची विकेट घेतली. सॅम्सच्या स्लोव्हर बाऊन्सरवर अय्यरचा फटका चूकला आणि तिलक वर्माने त्याला सोपा झेल घेतला. कोलकाताने ६ षटकांत ३५ धावांत २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर मुरुगन अश्विनने दोन धक्के दिले. सॅम बिलिंग ( १७) व नितीश राणा ( ८) हे अती घाई करत विकेट देऊन बसले आणि कोलकाताची अवस्था ४ बाद ८३ अशी झाली.
आंद्रे रसेलने खणखणीत षटकार खेचून वातावरण निर्माण केले, परंतु टायमल मिल्सने त्याची विकेट घेतली. रसेल ५ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला. आता कोलकाता अडचणीत येईल असे वाटत असताना पॅट कमिन्सने खतरनाक फटकेबाजी केली. वेंकटेश अय्यर एका बाजूने विकेट सावरून बाकी होता. त्याने ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १६व्या षटकात कमिन्सने कहरच केला. मिल्सच्या त्या षटकात त्याने ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६ खेचून कोलकाताला विजय मिळवून दिला. कमिन्स १५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांवर नाबाद राहिला. आयपीएल इतिहासात १४ चेंडूंत अर्धशतक झळकावून त्याने सर्वात जलद अर्धशतकाच्या लोकेश राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. वेंकटेश ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५० धावांवर नाबाद राहिला. KKR ने १६ चेंडूंत ५ बाद १६२ धावा करून सामना जिंकला.