MI vs PBKS | मोहाली : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला त्यांच्या घरात पराभूत करून सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईचा कालचा विजय म्हणजे व्याजासकट वसुली म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. कारण पंजाबने वानखेडेवर मुंबईला पराभवाची धूळ चारली होती. अर्शदीप सिंगने यजमानांच्या स्वप्नांचा चुराडा करत दोन स्टम्प तोडले होते. पण कालच्या सामन्यात इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी आपल्या मागच्या पराभवाचा बदला घेतला. पंजाबचा मुख्य गोलंदाज अर्शदीप सिंगने तर त्याच्या ३.५ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या.
दरम्यान, नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाने सावध खेळी करून साजेशी सुरूवात केली. पण अर्शद खानने यजमान संघाला पहिला झटका दिला. त्यापाठोपाठ शिखर धवन पियुष चावलाच्या जाळ्यात फसला. मुंबईचा संघ सामन्यात पकड बनवत असताना लियाम लिव्हिंगस्टोन पाहुण्या संघासाठी काळ ठरला. त्याने ४१ चेंडूत ७५ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. जितेश शर्माने देखील (४७) धावांची खेळी करून मुंबईसमोर २०० पार आव्हान ठेवले. पंजाबने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१४ धावा करून मुंबईला २१५ धावांचे तगडे आव्हान दिले होते. इशान-सूर्याच्या स्फोटक खेळीने मुंबईने सलग दुसरा विजय मिळवला.
सामनावीर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी सामन्यानंतर संवाद साधला, ज्याचा व्हिडीओ आयपीएलने शेअर केला आहे. यामध्ये किशन सूर्याची फिरकी घेत असल्याचे पाहायला मिळते आहे. "जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू चांगली खेळी करून श्रेय घेऊन जातो", असे किशनने मजेशीरपणे म्हटले. तर सूर्याने यावर बोलणे टाळले अन् म्हटले, "फलंदाजी करताना आम्ही क्रिकेटबद्दल अजिबात बोलत नव्हतो. आम्ही फक्त सामन्यानंतर रात्री काय करायचे याविषयी बोलत होते. यामुळेच दबाव कमी होत असतो", असे सूर्याने सांगितले.
तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. पण इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पंजाबची डोकेदुखी वाढवली. दोघांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली. सूर्याने ३१ चेंडूत ६६ तर इशानने ४१ चेंडूत ७५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या षटकांत या जोडीला बाद करण्यात पंजाबला यश आले. पण टीम डेव्हिड नाबाद (१९) आणि तिलक वर्माने नाबाद (२६) धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"