आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अटीतटीच्या लढतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत बंगळुरूने दिलेल्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. हे दोघेही फलंदाजी करत होते तेव्हा मुंबईचा सहज विजय होईल, असे वाटत होते. मात्र भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी अखेरच्या षटकांमध्ये सामन्याचं चित्र पालटवून टाकलं.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. रोहित शर्मा, रायन रिलेक्टन, विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव हे ठरावीक अंतराने बाद होत गेल्याने १२ व्या षटकात मुंबईची अवस्था ४ बाद ९९ अशी झाली होती. आता मुंबईचा पराभव निश्चित वाटत असतानाच कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मोर्चा सांभाळला आणि बंगळुरूवर जोरदार प्रतिहल्ला केला. या दोघांनीही तुफानी फटेबाजी करत अवघ्या ३४ चेंडूत ८९ धावा कुटून काढल्या. त्यामुळे आता मुंबईचा संघ सहजपणे विजयापर्यंत पोहोचेल असे वाटत होते. मात्र त्याचवेळी सामन्याने निर्णायक कलाटणी घेतली.
शेवटच्या १८ चेंडूत मुंबईला विजयासाठी ४१ धावांची आवश्यकता असतानाच भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला. त्याने किफायतशीर गोलंदाजी करताना षटकातील चौथ्या चेंडूवर तिलक वर्माला बाद केले. तर पुढच्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर जोश हेजलवूडने हार्दिक पांड्याची विकेट काढत मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. मात्र कृणाल पांड्याने मुंबईला कुठलीही संधी न देता तीन बळी टिपत मुंबईला २०९ धावांवरच रोखले.
तत्पूर्वी बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावून २२१ धावा कुटून काढल्या होत्या. बंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माच्या फटकेबाजीनंतरही मुंबईला विजयासाठी १२ धावा कमी पडल्या.