IPL 2021, MI vs RCB: आयपीएलचं काऊंटडाऊन आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. सलामीचा सामना उद्या खेळविला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि बंगळुरू संघासाठी देखील हा खेळाडू धोकादायक ठरू शकतो. मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणजे किरॉन पोलार्ड.
किरॉन पोलार्डनं एकदा मैदानात जम बसवला तर तो गोलंदाजांच्या नुसत्या चिंधड्या उडवतो याची कल्पना बंगळुरूच्या संघाला आहे. त्यामुळे विराट कोहलीचा संघ पोलार्डला कसं रोखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण किरॉन पोलार्ड देखील बंगळुरूचं आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सनं पोलार्डच्या सरावाचा एक दमदार व्हिडिओ ट्विट केलाय. यात पोलार्ड क्वारंटाइनचा कालावधी संपवून नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. पोलार्डनं यावेळी नेट्समध्ये खूप घाम गाळला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.
आरसीबीसाठी पोलार्ड ठरू शकतो डोकेदुखीकिरॉन पोलार्डची फटकेबाजी पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचे चाहते देखील आतुर झाले आहेत. पोलार्डचा फॉर्म बंगळुरू संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पोलार्डची फलंदाजीची आकडेवारी खूप चांगली राहिली आहे. पोलार्डनं तब्बल ३२ षटकारांच्या जोरावर केलेल्या १९२ धावा बंगळुरू संघ कधीच विसरू शकणार नाही. पोलार्डनं बंगळुरूविरुद्ध आतापर्यंत ५५६ धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १६६.५६ इतका राहिला आहे. पोलार्डने बंगळुरु विरोधात आतापर्यंत ३२ षटकार आणि ३९ चौकार ठोकले आहेत.