इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित होणार आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात हा सामना होणार आहे आणि विजयी संघ प्ले ऑफचं तिकिट पक्क करणार आहे. पण, या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापतीमुळे रोहितला टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळण्यात आले. पण, तासाभरातच MIनं कर्णधाराचा सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे रोहित खरंच दुखपातग्रस्त आहे का? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
रोहितची दुखापत एवढी गंभीर नाही, मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ५ आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना त्याला का वगळले? टीम इंडियातून वगळ्याएवढी रोहितची दुखापत गंभीर आहे, मग तो अजून UAEत काय करतोय? तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी का रवाना झाला नाही? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. त्यात आज तो खेळेल की नाही, यावरही संभ्रम आहेच. पण, InsideSportनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा आजही खेळणार नाही. मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी सांगितले की,''रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही. हाच एक सामना नाही, तर तो कदाचीत आणखी काही सामने मुकण्याची शक्यता आहे.''
''सराव सत्रात त्याच्या तंदुरुस्तीवरून पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी काही दिवस त्याच्या सराव सत्रातील कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल,''असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. १८ नोव्हेंबरला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रींग दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो मैदानाबाहेरच आहे. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता.
दरम्यान, माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे.''जर रोहितची दुखापत खरंच गंभीर असती, तर त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला नसता,'' असे गावस्कर म्हणाले. त्यांनी एका क्रीडा वाहिनीला सांगितले की, ''चाहत्यांना हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की, रोहितचा समावेश टीम इंडियामध्ये का नाही? बीसीसीआयने यामागचे कारण स्पष्ट करायला हवे. त्याला नेमके कोणत्या कारणामुळे संघाबाहेर ठेवण्यात आले हे कळालेच पाहिजे. रोहितच्या दुखापतीबाबत पूर्ण माहिती दिली पाहिजे.''
गावस्कर पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते फ्रेंचाईजी रोहितला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू इच्छित नाही. त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. प्रतिस्पर्धी संघाला यामुळे मानसिक फायदा होईल, अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. पण आपण सध्या भारतीय संघाविषयी चर्चा करत आहोत.’