आज आयपीएल २०२३ मधील ५४व्या सामन्यात मुंबई आणि बंगळुरु (MI vs RCB) या संघांमध्ये लढत होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा आमने-सामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. मुंबईविरुद्ध आरसीबीच्या या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणत्या संघाला यश मिळणार हे पाहावं लागेल. रोहितचा फॉर्म आणि डेथ ओव्हरमधील गोलंदाजी या दोन गोष्टी कशा सुधाराव्या लागतील. सहाव्या स्थानी असलेल्या मुंबईला प्ले ऑफ गाठायचे झाल्यास प्रमुख फलंदाजांना योगदान द्यावे लागणार आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने एक महत्वाचं भाष्य केलं आहे. आम्हाला मुंबईत खेळायला नेहमीच आवडतं. मला वाटते की मुंबई आमच्या खेळाच्या शैलीलाही अनुकूल आहे आणि मुंबई इंडियन्सला देखील हे मैदान अनुकूल आहे. त्यामुळे आजचा सामना खूप रोमांचक होणार आहे. मुंबई आणि आरसीबीचा नेहमीच स्पर्धात्मक खेळ असतो, असंही विराट कोहलीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, यंदाच्या हंगामात २ एप्रिल रोजी आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने २२ चेंडू शिल्लक असताना १७२ धावांचे लक्ष्य २ गडी गमावून गाठले आणि सामना ८ गडी राखून जिंकला. हा सामना दोन्ही संघांचा सलामीचा सामना होता. त्यामुळे आता आरसीबीला नमवून पराभवाचा बदला घेण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर आहे.
मुंबईच्या संघात मोठा बदल
ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीचा सामना करत असून त्याला विश्रांतीची गरज आहे. म्हणून त्याच्या जागी जॉर्डनला संधी देण्यात आली आहे. जॉर्डनला आर्चरची रिप्लेस म्हणून मुंबईने घेतले आहे. आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे लक्ष ठेवले जात आहे.