मुंबई - आयपीएल सामन्यात विजयाची मालिका सुरूच ठेवत, मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईने राजस्थानला नमविले. सूर्यकुमार यादवच्या शानदार नाबाद अर्धशतकानंतर जसप्रीत बुमराहच्या भेदकतेपुढे राजस्थान संघ कोलमडला. पराभवाचे दु:ख असतानाच राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत ४ बाद १९३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. राजस्थानचा डाव १८.१ षटकांत १३६ धावांत संपुष्टात आला. मात्र, प्रथम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने स्लो गतीने गोलंदाजी केली. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार स्टीव्ह स्मीथला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आाचरसंहितेप्रमाणे मर्यादीत वेळेपेक्षा अधिक काळ राजस्थानचा संघ गोलंदाजीसाठी मैदानावर होता. त्यामुळे, आयपीएल आचार संहितेचा भंग झाल्याने स्मीथ यास पंचाकडून 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्मीथ यांच्याअगोदर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही स्लो ओव्हरच्या सामन्याचा फटका बसला होता.
सामन्यात यंदा पहिल्यांदाच नव्या चेंडूने गोलंदाजी केलेल्या बुमराहने राजस्थानच्या फलंदाजीला खिंडार पाडत केवळ २० चेंडूंत ४ बळी घेतले. टेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनीही २ बळी घेतले. राजस्थानकडून जोस बटलरने ४४ चेंडूंत ७० धावा फटकावत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र मोक्याच्यावेळी त्याला बाद करुन मुंबईने पुनरागमन केले. त्याआधी, रोहित शर्मा-क्विंटन डीकॉक यांनी आक्रमक सुरुवात केल्यानंतरही मुंबईची धावगती काहीशी मंदावली. मात्र सूर्यकुमारच्या नाबाद ७० धावांमुळे मुंबईने आव्हानात्मक मजल मारली. श्रेयस गोपाळने एकाच षटकात रोहित शर्मा आणि ईशान किशन यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करुन मुंबईच्या धावगतीला ब्रेक दिला.
डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक ९ बळी घेत बुमराहने केली कागिसो रबाडाची बरोबरी. जसप्रीत बुमराहची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी.
टर्निंग पॉइंटसूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली विनिंग स्ट्रॅटेजी फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानानंतर बोल्ट व बुमराह यांनी भेदक मारा करीत वर्चस्वाची संधी दिली नाही.
सामन्यातील रेकॉर्डसूर्यकुमारची याआधीची सर्वोत्तम खेळी ७२ धावांची होती. २०१८ साली राजस्थानविरुद्धच सूर्यकुमारने ही खेळी केली होती. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक १० बळी पॉवर प्लेमध्ये गमावले. आरसीबी, सीएसके आणि राजस्थान यांनी प्रत्येकी ७ बळी पॉवर प्लेमध्ये गमावले आहेत.