Join us  

IND vs AUS: ट्वेंटी-20 क्रिकेटमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दयनीय अवस्था; मायकल हसीचा मोठा दावा

michael hussey on australia team: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 5:29 PM

Open in App

IND vs AUS Test Series । नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. अशातच ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या खराब खेळीवर माजी फलंदाज मायकल हसीने एक मोठे विधान केले आहे. 

दरम्यान, ट्वेंटी-20 क्रिकेटमुळेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटी सामन्यांमध्ये असे फटके खेळायला सुरुवात केली आहे, असे मायकल हसीने म्हटले आहे. हसीच्या म्हणण्यानुसार, 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत असे फटके कसोटीत पाहायला मिळत नव्हते, पण आता फलंदाजांनी तिरपे फटके मारायला सुरुवात केली आहे. खरं तर दिल्ली कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे बहुतांश फलंदाज स्वीप शॉट्स खेळून बाद झाले. त्यांनी सरळ शॉट मारण्याचा प्रयत्न देखील केला नाही, परंतु स्वीप शॉट खेळण्याचा अधिक प्रयत्न केला आणि ते स्वस्तात माघारी परतले. यावरून त्यांना आता टीकेचा सामना करावा लागत आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीने सांगितले की, "हे सर्वकाही ट्वेंटी-20 क्रिकेटच्या प्रभावामुळे होत आहे. यातील बहुतेक शॉट्स आपण लहान फॉरमॅटमध्ये पाहतो. असे रॅम्प शॉट्स 10-15 वर्षांपूर्वी पाहिले नव्हते. चांगली गोष्ट आहे की तुम्ही ते शॉट्स खेळू शकता पण ते जास्त महत्त्वाचे आहेत का हे पाहायला हवे. हा शॉट तुम्ही कोणत्या वेळी वापरत आहात आणि समोरचा गोलंदाज कोण आहे हे पाहावे लागेल. मला वाटत नाही की ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी योग्य वेळी योग्य गोलंदाजांविरुद्ध त्यांचे शॉट्स खेळले आहेत", असे हसीने फॉक्स क्रिकेटशी संवाद साधताना म्हटले. 

BGT मालिकेत भारताचे वर्चस्व भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून रोहित सेनेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यात कोहलीने काही खास कामगिरी केली नाही, तरीदेखील त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा आकडा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 64 धावा केल्या.  

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटडेव्हिड वॉर्नरभारतीय क्रिकेट संघ
Open in App