लंडन : ‘इंग्लंडचे खेळाडू ॲशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविरुद्ध फारच मैत्रीपूर्ण वागत आहेत. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवायचा असेल तर त्यांना कठोर बनावेच लागेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंशी इतकी जवळीक योग्य नाही,’ असा मोलाचा सल्ला माजी कर्णधार मायकेल वॉन याने दोन सामने गमावल्यानंतर आपल्या खेळाडूंना दिला आहे.
इंग्लंडला दोन्ही सामन्यांत पराभवाची नामुष्की झेलावी लागल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत संघ ०-२ ने माघारला. इंग्लंड संघाचे ५१ सामन्यांत नेतृत्व करीत २६ सामने जिंकून देणारा वॉन म्हणाला, ‘आमचे खेळाडू फारच भोळेपणाने वागतात. सामन्याच्या सकाळी मी त्यांना मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांच्याशी गप्पा मारताना पाहतो. याउलट मी स्टीव्ह वॉ याच्यासोबत खेळाच्या दिवसांत कधीही चर्चा करीत नव्हतो. सामन्याच्या सकाळी मी ग्लेन मॅकग्रा किंवा शेन वॉर्न यांच्याशीही बोलत नव्हतो. सध्या खूपच गोडीगुलाबी सुरू आहे. मी असतो तर कठोर भूमिका घेतली असती. इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानावरील वागणूक बदलावी. त्यांना कठोर व्हावे लागेल. विजयाची भूक असल्याचे हावभाव खेळात आणावे लागतील.’
माजी कर्णधार मायकेल आथरटन म्हणाला, ‘इंग्लंडची अशीच दारुण कामगिरी सुरू राहिली तर जो रुटला नेतृत्व सोडावे लागेल. दौऱ्यात अशीच घसरगुंडी होत राहिल्यास रुटच्या नेतृत्वाचे काही खरे नाही.’ रुटच्या नेतृत्वात इंग्लंडने २३ कसोटी सामने गमावले.