नवी दिल्ली : रविवारी टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लिश संघाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विश्वचषकाचा किताब पटकावला. भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. खरं तर इंग्लिश संघानेच रोहित सेनेला स्पर्धेतून बाहेर केले होते. मागील वर्षी यूएईच्या धरतीवर झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ प्रबळ दावेदार होता. मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले.
इंग्लंडकडे सर्वोत्तम संघ आहे
या पराभवानंतर भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात नवा कर्णधार मिळाला. राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तेव्हा असे सांगण्यात आले की भारत अधिक आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी नवीन फलंदाजी टेम्पलेटवर काम करत आहे. पण असे काहीही दिसले नाही आणि भारतीय संघ 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी खेळून बाहेर पडला. यावरूनच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. मायकल वॉनने द टेलिग्राफमधील त्याच्या लेखात लिहले, "इंग्लंडने विश्वचषक जिंकायलाच हवा होता कारण त्यांच्याकडे सर्वोत्तम संघ आहे. परंतु आपण अनेकदा पाहतो की सर्वोत्कृष्ट संघ त्यांच्या प्रतिभेनुसार खेळत नाहीत. 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडने जे केले होते तेच त्यांनी यावेळी केले. ते त्या नशिबाला पात्र आहेत कारण त्यांनी मोठ्या कालावधीपासून योग्यरित्या काम केले आहे."
"इंग्लंडचा संघ कधीही घाबरलेला नाही. 2019 मध्ये ते टूर्नामेंटच्या सुरुवातीचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून हरले होते. यावेळी देखील त्यांनी आयर्लंडकडून पराभव पत्करला होता. दोन्ही वेळा इंग्लंडसाठी सर्व संपल्यासारखे होते. पण जिंकायचं कसं ही त्यांची मानसिकता आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत", अशा शब्दांत मायकल वॉनने आपल्या संघाचे कौतुक केले.
मायकल वॉनने दिला सल्ला
मायकल वॉनने अधिक लिहिले, "इंग्लंडच्या व्हाईट बॉल क्रिकेटमधील खेळाडूंचा हा संघ असाधारण आहे. त्यामुळे जेव्हा इंग्लिश क्रिकेटमध्ये ट्रेंड सेट करणारा संघ असतो, तेव्हा उर्वरित जगाने त्याचे अनुकरण केले पाहिजे. इंग्लंडचे काम कसे चालले आहे? ते काय करतात? जर मी भारतीय क्रिकेट चालवत असतो तर मी माझा अभिमान बाजूला केला असता आणि प्रेरणा घेण्यासाठी इंग्लंडकडे पाहिले असते." एकूणच मायकल वॉनने भारतीय संघाने त्यांचा अभिमान बाजूला करायला हवा असा सल्ला दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Michael Vaughan has said that the Indian team should put their pride aside and take inspiration from England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.