इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. नुकतंच त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर निशाणा साधताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे म्हटले होते. त्यावरून भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर यांनं त्याला उपरोधित टोला लगावला होता. आता विराटच्या मुद्यावरून वॉन व पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट ( Salman Butt) यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले आहे. सलमाननं इंग्लंडच्या माजी कर्णधारावर टीका करताना काही आकडेवारी समोर मांडली, त्यावरून वॉन खवळला अन् सलमानला मॅच फिक्सर म्हणून मोकळा झाला.
सलमान बट काय म्हणाला?
जगातील सर्वात लोकसंख्या असलेल्या देशातून विराट कोहली खेळतोय, परंतु त्याची कामगिरीही बोलकी आहे. विराट कोहलीच्या नावावर ७० आंतरराष्ट्रीय शतकं आहेत, त्याच्यासोबतच्या फलंदाजांमध्ये इतक्या शतकांच्या आसपासही कुणी नाही. त्यानं कामगिरीच्या जोरावर आयसीसी क्रमवारीतही वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे कोणत्या निकषाच्या जोरावर त्याच्यासोबत तुलना केली जातेय आणि ती कोण करतंय? मायकेल वॉन. तो इंग्लंडचा चांगला कर्णधार होता, पण फलंदाज म्हणून त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तो कसोटीतील चांगला फलंदाज होता, परंतु वन डे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नाही, असे सलमान बटनं यू ट्यूब चॅनलशी बोलताना म्हटले.
वॉननं ८२ कसोटीत १८ शतकं झळकावली आहेत, परंतु वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकही शतक नाही. १९९९ ते २००७ या कालावधीत त्यानं ७६०० धावा केल्या.
मायकेल वॉननं काय प्रत्युत्तर दिले?
वॉननं बांगला भाषेतील एका ट्विटवर कमेंट केली. तो म्हणाला,''ही हेडलाईन काय आहे, याची कल्पना नाही, परंतु सलमान बट माझ्याबद्दलच म्हणतोय. त्यावर माझा आक्षेप नाही आणि त्याला त्याचे मत मांडण्याचा हक्क आहे. पण, त्याला एवढंच सांगू इच्छितो की २०१०मध्ये तो त्याच्या मतांवर ठाम असता, तर मॅच फिक्सिंग केली नसती.''
पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान, गोलंदाज मोहम्मद आसीफ आणि मोहम्मद आमीर यांच्यावर २०१०च्या इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आयसीसीनं पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती. सलमान बटनं ३३ कसोटी, ७८ वन डे व २४ ट्वेंटी-२० सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
Web Title: Michael Vaughan recalls Salman Butt's spot-fixing scandal to hit back at former Pakistan skipper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.