दुबई : ‘मिशेल मार्शला आपल्या कारकिर्दीत अनेकदा अनावश्यक टीकेला सामोरे जावे लागले आहे. परंतु, यानंतरही त्याने हार मानली नाही आणि आपले सर्वोत्तम प्रयत्न सुरू ठेवले. रविवारी झालेल्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने आपली क्षमता दाखवून दिली,’ अशी प्रतिक्रिया टी-२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ॲरोन फिंच याने व्यक्त केली. रविवारी फिंचने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५० चेंडूंत नाबाद ७७ धावांची खेळी करीत कांगारुंना पहिले टी-२० विश्वविजेतेपद मिळवून दिले. या सामन्यांनंतर फिंच म्हणाला की, ‘त्याने दीर्घ कालावधीपर्यंत टीकेचा सामना केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारात त्याची कामगिरी वाईट नसताना त्याला टीका सहन करावी लागली. त्याच्या एकदिवसीय क्रिकेटवरील कामगिरीवर नजर टाकल्यास त्याची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येईल. लोकांच्या टीकेला सामोरे जाऊनही त्याने शानदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यावरून त्याची क्षमता दिसून येते.’
३१ वर्षीय मार्शला सातत्याने विविध दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षीही त्याला टाचेच्या दुखापतीने त्रस्त केले होते. गेल्या एक दशकापासून तो ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, ॲशेसमधील दोन शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमधील एक शतकाच्या व्यतिरिक्त त्याला फारसे काही करता आलेले नाही. आता टी-२० विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने क्रिकेटचाहत्यांचे लक्ष वेधले आहे.गेल्या वर्षी मार्शने म्हटले होते की, अनेक ऑस्ट्रेलियन समर्थक त्याच्यावर नाराज आहेत. याबाबत फिंचला विचारले असता, त्याने सांगितले की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात जितक्या लोकांना भेटाल, त्यामध्ये मार्श खूप चांगला आहे. तो नक्कीच विशेष खेळाडू आहे. मार्शला वेस्ट इंडीजमध्ये तिसऱ्या स्थानी पाठविण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. तो या क्रमांकावर चांगला खेळ करेल, याची आम्हाला खात्री होती. वेगवान गोलंदाजीविरुद्ध तो चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो.’
मार्शने म्हटले की, ‘फलंदाजी क्रमवारीत मला तिसऱ्या स्थानी पाठविण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय योग्य ठरला. सहा महिन्यांआधी कोचिंग स्टाफने मला, मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे सांगितले होते. हे ऐकून मी खूप आनंदी झालो होतो. मी देशांतर्गत स्पर्धेत पर्थ स्कोरचर्स संघासाठी ही जबाबदारी पार पाडली होती. फलंदाजी क्रमवारीत मला आघाडीच्या फळीत स्थान देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनमधील सहभागी प्रत्येक सदस्याचे मी आभार मानतो.’ मार्शने पुढे म्हटले की, ‘मला या शानदार संघात माझी भूमिका निभावण्यास आवडतं. सध्या माझ्या भावना व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. संघासोबत व्यतित केलेले हे शानदार सहा आठवडे अविस्मरणीय आहेत. मी ऑस्ट्रेलियन संघावर खूप प्रेम करतो. आम्ही विश्वविजेते आहोत.’