पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संघात झालेल्या मोठ्या बदलांमुळे परदेशी प्रशिक्षक नाराज होते. सर्वांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. पीसीबीने कर्णधार निवड समिती बरखास्त करून प्रशिक्षकासह संघ संचालकात बदल केले असताना तिन्ही परदेशी प्रशिक्षकांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला असल्याचे पीसीबीने सांगितले.
भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर बाबर आजमला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडावे लागले. इंझमाम उल हक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती स्पर्धेदरम्यानच बरखास्त करण्यात आली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की, परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी राष्ट्रीय संघ आणि बोर्डासह त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
वन डे वर्ल्ड कपनंतर या सर्वांवर अन्य जबाबदारी दिली गेली होती. त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी देण्यात आली. या तिघांसह गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल हे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघासोबत होते. पाकिस्तानला स्पर्धेच्या बाद फेरीपर्यंतही पोहोचता आले नाही, त्यानंतर पीसीबी व्यवस्थापकीय समितीचे प्रमुख झाका अश्रफ यांनी त्यांना एनसीएकडे पाठवले. तिघांनीही नकार देत रजा घेऊन घरी परतले.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लगेचच मॉर्केलने राजीनामा दिला. या तिघांनाही स्वतःहून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे बोर्डातील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. करारानुसार, पीसीबीने त्यांना बडतर्फ केले असते, तर त्याला सहा महिन्यांचे वेतन द्यावे लागले असते. सूत्रांनी सांगितले की, तिघांशी चर्चा यशस्वी झाली असून त्यांनी जानेवारीच्या अखेरीस राजीनामा देण्याचे मान्य केले आहे.