पार्ल : बलाढ्य ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत अपेक्षित सुरुवात करताना न्यूझीलंडला ९७ धावांनी सहज नमवले. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या ॲश्ले गार्डनरने केवळ १२ धावांमध्ये ५ बळी घेत न्यूझीलंड संघाची हवा काढली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ९ बाद १७३ धावा केल्यानंतर न्यूझीलंडला १४ षटकांत केवळ ७६ धावांमध्ये गुंडाळले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून केवळ अमेलिया केर (२१), बर्नाडिन बेझुडेनहौट (१४) आणि जेस केर (१०) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. गार्डनरने ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त करताना अर्धा संघ बाद केला. मेगन शटने (२/८) दोन, तर डार्सी ब्राऊन आणि एलिसे पेरी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
संक्षिप्त धावफलक :ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ९ बाद १७३ धावा (अलिसा हिली ५५, मेग लॅनिंग ४१, एलिसे पेरी ४०; अमेलिया केर ३/२३, ली ताहुहु ३/३७.) वि. वि. न्यूझीलंड : १४ षटकांत सर्वबाद ७६ धावा (अमेलिया केर २१, बर्नाडिन बेझुडेनहौट १४, जेस केर १०; ॲश्ले गार्डनर ५/१२, मेगन शट २/८.)
अलिसा हिलीने ३८ चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंग (३३ चेंडूंत ४१ धावा) आणि एलिसे पेरी (२२ चेंडूंत ४० धावा) यांनीही हिलीला चांगली साथ देत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. ली ताहुहु (३/३७) आणि अमेलिया केर (३/२३) यांनी न्यूझीलंडकडून चांगली गोलंदाजी केली.