कोलकाता : आयपीएलमध्ये यंदाच्या पहिल्या क्वालिफायर वनमध्ये गुजरात टायटन्ससाठी अंतिम सामन्याचे तिकीट पक्के करणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरला मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी एकाही फ्रेंचाइजीने मिलरमध्ये रस दाखवला नाही. एक कोटी मूळ किंमत असलेला मिलर ‘अनसोल्ड’ राहिला होता.
मिलरने कदाचित विचार केला असेल की, त्याला दुसऱ्या दिवशी मोठ्या रकमेसह खरेदीदार मिळेल. राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी बोली लावायला सुरुवात केली, राजस्थानने ‘किलर मिलर’मध्ये रस दाखवताच गुजरातनेही बोली लावायला सुरुवात केली आणि ही बोली तीन कोटींवर पोहोचली. टायटन्सने तीन कोटींची शेवटची बोली लावली, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने आणखी बोली लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि मिलर तीन कोटी रुपयांत गुजरात संघात दाखल झाला.
डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरने १५ सामन्यांत ४४९ धावा केल्या आहेत आणि या सत्रात गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो दुसऱ्या स्थानी आहे. मोसमात ६४ पेक्षा जास्त सरासरी आणि १४१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्यात २९ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश आहे. या खेळाडूने गुजरातला अनेक वेळा बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले.