जोहान्सबर्ग - भारतात कानपूर वनडेमध्ये धावांची बरसात होत असताना तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात अवघ्या 35 चेंडूत शतकी खेळी करत ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. मिलरने आपल्या वादळी खेळीदरम्यान 7 चौकार आणि 9 षटकार ठोकले.
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम याआधी दक्षिण आफ्रिकेच्याच रिचर्ड लेवीच्या नावे होता. लेवीने 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात 45 चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळती झाली होती. एकवेळ त्यांचा डाव 3 बाद 78 असा गडगडला. मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या डेव्हिड मिलरने तुफानी फटकेबाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांचा चिंधड्या उडवल्या. या खेळीदरम्यान, मिलरने 19 व्या षटकात सलग 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले. मात्र सहाव्या चेंडूला सीमारेषेबाहेर धाडण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याच्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची त्याची संधी हुकली.मिलरने केलेल्या 36 चेंडूत नाबाद 101 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 4 बाद 224 धावा कुटल्या. त्यानंतर बांगलादेशला 141 धावांत रोखत 83 धावांनी विजय मिळवला.