Join us  

भारत-पाक लढतीत मानसिकता महत्त्वाची ठरणार

पाकिस्तानचा संघ किती मजबूत आहे याची जाणीव भारतीयांना आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:31 PM

Open in App

- अयाझ मेमन

आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशने श्रीलंकेला नमवून खूप चांगली सुरुवात केली. बांगलादेशला नेहमीच क्रिकेटप्रेमी गृहीत धरत आले आहेत. त्यांना आपण सहज नमवू असा विश्वास प्रत्येक देशाच्या चाहत्यांना असतो. पण गेल्या दोन - तीन वर्षांपासून विशेष करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशची कामगिरी खूप शानदार ठरली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडूनही खूप चुका झाल्या. त्यांनी अनेक झेल सोडले. एकूणच बांगलादेशविरुद्धचा पराभव त्यांना मोठा झटका होता आणि त्यांच्यासाठी करा अथवा मरा अशीच स्थिती निर्माण झाली होती. सध्या श्रीलंकन क्रिकेट अडचणीत आहे. त्यांनी नुकतेच दक्षिण आफ्रिकेला कसोटीमध्ये नमवले असले, तरी त्यांची एकूण कामगिरी चांगली ठरलेली नाही. अँजेलो मॅथ्यूजचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले असून त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची आशा आहे. तसेच, दिग्गज लसिथ मलिंगा यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना चांगली गोलंदाजी केली. पण केवळ एक किंवा दोन खेळाडूंच्या जिवावर तुम्ही सामना, स्पर्धा जिंकू शकत नाही. त्यामुळे श्रीलंकेला खूप मेहनत करावी लागणार आहे.दुसरीकडे, बांगलादेशच्या रूपाने भारत आणि पाकिस्तानला एक धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्याचबरोबर भारतालापाकिस्तानविरुद्ध खूप जबाबदारीने खेळावे लागेल. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ किती मजबूत आहे याची जाणीव भारतीयांना आहे. भारत - पाकिस्तान एकमेकांविरुद्ध सातत्याने खेळत नसल्याने त्यांच्या सर्वच खेळाडूंची माहिती जवळ नसली, तरी काही प्रमुख खेळाडूंविषयी मात्र पुरेपूर माहिती जवळ आहे. त्यांचा संघ युवा असून चांगला खेळतोय. त्यांची गोलंदाजी शानदार आहे. कागदावर भारतीय संघ अनुभवी आणि मजबूत भासेल. तरी विराट कोहलीचा संघात समावेश नाही. असे असले तरी भारतीय संघ मजबूत आहे. हा सामना नक्कीच दबावपूर्ण असेल यात शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सर्वोत्तम होता, पण अंतिम सामन्यात पाकविरुद्ध पराभूत झाला. त्यामुळे या सामन्यात जो संघ मानसिकरीत्या मजबूत असेल, तोच जिंकेल.गोलंदाजी पाकिस्तानची नेहमीच ताकद राहिली आहे. त्यांची स्विंग गोलंदाजी घातक शस्त्र ठरणारी असते. एकूणच भारतीय संघापुढे मोठे आव्हान असेल. कारण संघाला पाकिस्तानला नमवायचे आहे, आशिया चषक जिंकायचा आहे आणि त्यात आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघात काही प्रयोगही करायचे आहेत. त्यामुळे शास्त्री - रोहित यांना एकाचवेळी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.भारत - पाकिस्तान सामन्यात रोमांच नक्कीच असेल आणि या स्पर्धेत तब्बल तीन सामने या दोन संघांमध्ये होण्याची शक्यता आहे. पहिला सामना बुधवारी होईल, त्यानंतर सुपर फोर फेरीत पुन्हा भारत - पाक आमनेसामने येतील आणि अंतिम फेरी गाठण्यात दोन्ही संघ यशस्वी ठरले तर तिसऱ्यांदा क्रिकेटप्रेमींनाथरार अनुभवण्याची पर्वणी असेल.

(लेखक संपादकीय सल्लागार आहेत)

टॅग्स :भारतपाकिस्तानआशिया चषक