नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षीच्या प्रारंभी नव्या टी-२० लीगची सुरुवात होणार आहे. यात नऊ संघ राहतील. त्यापैकी सहा संघांची मालकी आयपीएलमधील संघ मालकांकडे असेल. त्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघांचा समावेश आहे. हे एक प्रकारचे मिनी आयपीएल आयोजन ठरणार आहे.
आयपीएल संघ मालकांनी लीगमधील संघ खरेदी करण्यात रुची दाखविली खरी, मात्र भारतीय खेळाडूंविना आयपीएलसारख्या लीगची कल्पनादेखील शक्य नाही. द. आफ्रिकेत मात्र विदेशी खेळाडूंचा सहभाग असावा, अशी फ्रॅन्चायजी मालकांची इच्छा आहे. १३ जुलै रोजी फ्रॅन्चायजीचा लिलाव बंद झाला. आयपीएल संघांनी यात मोठी गुंतवणूक केली.
एका क्रीडा वेबसाइटनुसार, मुंबई इंडियन्सकडून अंबानी कुटुंबीय, सीएसकेतर्फे एन. श्रीनिवासन, दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल, सनरायजर्सचे मारन कुटुंबीय, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बदाडे या सहा फ्रॅन्चायजींनी संघ खरेदी केले. फ्रॅन्चायजींच्या निवडीची घोषणा या महिन्याअखेर होईल, असे सीएसएचे म्हणणे आहे. आयपीएल फ्रॅन्चायजी मालकांना असेही सांगण्यात आले की, लिलावात त्यांना संघ मिळाले आहेत. शहरांची पसंती सांगावी, असेही सुचविण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सने केपटाऊन शहराला पसंती दर्शविली, तर सीएसकेने जोहान्सबर्ग शहरात रुची दाखविली. दिल्ली संघ प्रिटोरियातील सेंच्युरियनमध्ये रुची दाखवित असून या संघाचे नाव प्रिटोरिया कॅपिटल असे असेल. संजीव गोयंका हे दरबन तर सनरायजर्स संघ एलिझाबेथ शहरात रुची दाखवित आहेत. तॉयल्सला पार्ल शहर हवे आहे. एमआय आणि सीएसकेने सर्वाधिक २५० कोटींची बोली लावल्याची माहिती आहे. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक फ्रॅन्चायजीला दहा वर्षांसाठी १० टक्के रक्कम जमा करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेत जानेवारीत हे आयोजन होणार असून त्याच वेळी यूएईत आणखी एक लीग होईल. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अष्टपैलू लियॉम लिव्हिंगस्टोन यांच्यासह इंग्लंडचे मुख्य खेळाडू सीएसए लीगमध्ये खेळण्यास इच्छुक आहेत. मोईन अली यूएईत खेळणार असून फाफ डुप्लेसिस द. आफ्रिकेत असेल. ड्वेन ब्राव्हो हा सीएसकेसाठी खेळू शकेल.
ग्रॅमी स्मिथ टी-२० लीगचे आयुक्त
दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांची सीएसएने टी-२० लीगचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लीगचे आयोजन पुढच्या वर्षी जानेवारीत होईल. देशाचे यशस्वी कर्णधार ठरलेले स्मिथ हे लीगशी संबंधित सर्व कामे पाहतील. द. आफ्रिका क्रिकेटप्रति आपण समर्पित असल्याची प्रतिक्रिया स्मिथ यांनी व्यक्त केली.
सीएसए टी-२०त आयपीएल फ्रॅन्चायजीला मिळालेली शहरे
- मुंबई इंडियन्स : केप टाऊन
- चेन्नई सुपर किंग्स : जोहान्सबर्ग
- दिल्ली कॅपिटल्स : सेंच्युरियन
- लखनौ सुपर जायंट्स : दरबन
- सनरायजर्स हैदराबाद : पोर्ट एलिझाबेथ
- राजस्थान रॉयल्स : पार्ल
Web Title: mini ipl to be held in south africa will buy six franchise teams in India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.