Join us  

Mirabai Chanu Wins Gold: मीराबाई चानूची कमाल! दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'

मीराबाई चानूने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 191 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 8:12 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या मीराबाई चानूने शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात 191 किलोचा भार उचलून ही किमया साधली. ऑगस्ट 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे मीराबाई ही तिच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. विशेष बाब म्हणजे दुखापतीतून सावरत मीराबाई चानूने सुवर्ण भार उचलला आहे. 

191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड' मीराबाई चानूने सुवर्ण कामगिरी केल्यानंतर म्हटले, "अलीकडेच NIS पटियाला येथे प्रशिक्षणादरम्यान माझ्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती, त्यानंतर मी जास्त धोका पत्करणार नाही, असे ठरवले. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा देखील डिसेंबरमध्ये होणार आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि आनंद गगनात न मावणारा आहे. जेव्हा मला उद्घाटन समारंभात दलाचे नेतृत्व करण्यास सांगितले गेले तेव्हा माझा उत्साह अनेक पटीने वाढला. खरं तर उद्घाटन समारंभास उपस्थित राहणे सहसा खूप व्यस्त असते कारण माझ्या स्पर्धा दुसऱ्या दिवशी लवकर सुरू होतात."

विश्व चॅम्पियनवर असेल लक्ष - मीराबाई चानू भारताच्या या दिग्गज खेळाडूचे पुढचे लक्ष्य विश्व चॅम्पियनशिप असणार आहे, जिथे ती आशियातील काही मोठ्या लिफ्टर्सविरूद्ध लढण्याची अपेक्षा आहे. 28 वर्षीय मीराबाई चानूने सांगितले, "होय, माझ्याकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत एकही पदक नाही. पाठीच्या दुखापतीमुळे 2018 च्या हंगामातून बाहेर पडल्यानंतर ही माझी पहिलीच आशियाई क्रीडा स्पर्धा असणार आहे. आशियातील स्पर्धा चांगली होईल पण माझे लक्ष सध्या विश्व चॅम्पियनशिपवर आहे, जिथे मला प्रतिस्पर्धी खेळाडूंविरूद्ध संघर्ष करण्याची संधी मिळेल." 

तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये संजीता चानूने एकूण 187 किलो (स्नॅचमध्ये 82 किलो, क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो) वजन उचलून रौप्यपदक आपल्या नावावर केले. तर ओडिशाच्या स्नेहा सोरेनने एकूण 169 किलो (स्नॅचमध्ये 73 किलो, क्लीन अँड जर्कमध्ये 96 किलो) भार उचलून कांस्यपदक पटकावले आहे. 

 

टॅग्स :मीराबाई चानूवेटलिफ्टिंगसुवर्ण पदकभारत
Open in App