नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हकने म्हटले की, सध्या देशात बाबर आझमच्या कर्णधारपदाला कमकुवत करण्याची मोहीम सुरू असून या तमाशामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामकाजात अडथळे येत आहेत. तसेच जर लोक कर्णधार बाबर आझमला खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले नाही, असेही त्याने म्हटले. खरं तर पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीमुळे बाबर बराच काळ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.
जिओ न्यूजशी बोलताना मिस्बाह उल हकने म्हटले, "हे स्पष्टपणे दिसत आहे की बाबरला कमकुवत होण्यास भाग पाडले जात आहे, जे योग्य नाही. पत्रकार परिषद घेऊन बाबर याला काय प्रश्न विचारले जात आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. कठीण निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्यावा. मला वाटते की आमचे खेळाडू, निवड समिती आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी एकत्र बसून यावर निर्णय घ्यावा."
मिस्बाह उल हकने टीकाकारांना सुनावले "तुम्ही इतर कोणत्याही कारणासाठी कोणावर दबाव आणलात तर संपूर्ण संघ डिस्टर्ब होईल. पाकिस्तान संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मजबूत संघ आहे. खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती केल्याने सर्व काही विस्कळीत होईल. कारण त्यामुळे आपल्यामध्येच स्पर्धा निर्माण होते आणि राजकीय वातावरण तयार होते", अशा शब्दांत मिस्बाहने बाबर आझमच्या विरोधकांना सुनावले.
पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका -
- पहिला सामना - 9 जानेवारी
- दुसरा सामना - 11 जानेवारी
- तिसरा सामना - 13 जानेवारी
न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इमाम उल हक, कामरान घुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहनवाज दहानी, शान मसूद, (उप कर्णधार) तय्याब ताहिर, उसामा मीर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"