अयाज मेमन
चेन्नई : पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने आपली मजबूत गोलंदाजी सिद्ध केली. मात्र, तरीही अपुऱ्या धावसंख्येचे पाठबळ असल्याने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबईला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. दिल्लीने सहा सामन्यांतून पहिल्यांदाच मुंबईला नमवले हे विशेष.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची फलंदाजी पुन्हा कोलमडली आणि त्यांना २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या. मात्र, तरीही गोलंदाजांच्या जोरावर मुंबईकरांनी दिल्लीला विजयासाठी अखेरपर्यंत झुंजवले. दिल्लीने १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा केल्या. शिखर धवन (४५), स्टीव्ह स्मिथ (३३) आणि ललित यादव (२२*) यांनी संयमी खेळी करीत दिल्लीच्या विजयात योगदान दिले. मुंबईकरांनी गोलंदाजीत चमक दाखवत दिल्लीला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. दबावाच्या क्षणी अतिरिक्त १० धावा दिल्याचा मुंबईला काहीसा फटका बसला.
त्याआधी, दिल्लीनेही जबरदस्त गोलंदाजी करीत मुंबईच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावले. खास करून लेगस्पिनर अमित मिश्राने आपला अनुभव पणास लावला. त्याने २४ धावांत ४ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता कोणीही छाप पाडली नाही. सूर्यकुमार यादवसह (२४) त्याने ५८ धावांची भागीदारी करीत मुंबईला मजबूत स्थितीत आणले. मात्र, सातव्या षटकात आवेश खानने सूर्यकुमारला बाद केले आणि मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. चांगल्या प्रकारे स्थिरावलेला रोहित अर्धशतकापासून ६ धावांनी दूर असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. केवळ १७ धावांत पाच प्रमुख फलंदाज गमावल्याने मुंबईची १ बाद ६७ वरून ६ बाद ८४ अशी घसरगुंडी उडाली. इशान किशन व जयंत यादव यांच्या ३९ धावांच्या भागीदारीमुळे मुंबईने समाधानकारक धावा केल्या.
Web Title: Mishra took the spin of Mumbai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.