Kane Williamson : न्यूझीलंडच्या संघासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ म्हणजे एक वाईट स्वप्नच. केन विल्यमसनच्या नेतृत्वातील संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. गुरुवारी वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पराभव करून सुपर-८ मध्ये प्रवेश केला. अशातच एका पाकिस्तानी पत्रकाराने न्यूझीलंड संघाची खिल्ली उडवली आणि त्यांच्या देशाप्रती असलेल्या खेळाडूंच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मिचेल मॅकक्लेनघनने या पत्रकाराला फटकारले आहे.
पाकिस्तानच्या पत्रकाराने 'एक्स'वर केन विल्यमसन बाद झाल्याचा एक फोटो शेअर केला. यामध्ये त्याने लिहिले की, जेव्हा आपण राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देऊ लागतो तेव्हा हे घडते. (विल्यमसन १ धाव करून बाद) पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून न्यूझीलंडला ट्वेंटी-२० विश्वचषकाची तयारी करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र अनेक बडे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत राहिले. आता बघा ते वर्ल्ड कपमधून बाहेर होत आहेत.
मिचेल मॅकक्लेनघनचा संतापपाकिस्तानी पत्रकाराने भलतीच बाब मांडल्यानंतर न्यूझीलंडचा माजी खेळाडू संतापला. त्याने पाकिस्तानची लायकी काढली. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मिचेल मॅकक्लेनघनने पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टवर व्यक्त होताना म्हटले की, हा तोच पाकिस्तान संघ आहे जो न्यूझीलंडच्या 'सी' संघाकडून पराभूत झाला होता. याशिवाय आयर्लंड आणि अमेरिकेकडूनही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने दोनपैकी दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह सुपर-८ साठी दावा ठोकला आहे. खरे तर न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकल्यास आणि अफगाणिस्तानने उरलेले दोन्ही सामने गमावल्यास दोन्ही संघांचे ४-४ गुण राहतील. पण, नेटरनरेटच्या बाबतीत राशिद खानचा संघ वरचढ असल्याने ते सुपर-८ साठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. सध्या अफगाणिस्तानचा सामना सुरू असून, ते सहज विजय मिळवून सुपर-८ चे तिकीट कन्फर्म करतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे किवी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.