West Indies vs Australia, 4th T20I - मिचेल मार्शची अष्टपैलू कामगिरी अन् मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडिजवर ४ धावांनी थरारक विजय मिळवला. मिचेल मार्श व कर्णधार आरोन फिंच यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ६ बाद १८९ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लेंडल सिमन्स आणि एव्हीन लुईस यांनी दमदार फटकेबाजी केली. पण, स्टार्कनं अखेरच्या षटकात आंद्रे रसेलची भंबेरी उडवणारी गोलंदाजी केली अन् कांगारूंनी दौऱ्यावर पहिला विजय मिळवला. मार्शनं तीन विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजी करताना मॅथ्यू वेड ५ धावांवर माघारी परतल्यानं ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. पण, कर्णधार फिंच आणि मिचेल मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी करताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. फिंचनं ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. मार्शनं ४४ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला आणखी मोठी धावसंख्या उभी करता आली असती, परंतु अन्य फलंदाज अपयशी ठरले. डॅन ख्रिस्टीयननं १४ चेंडूंत २२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ६ बाद १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. विंडीजच्या हेडन वॉल्शनं २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात लेंडल सिमन्स आणि इव्हीन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. लुईस १४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. ख्रिस गेल ( १) व आंद्रे फ्लेचर ( ६) अपयशी ठरले. आंद्रे रसेल व फॅबिएन अॅलन यांनी विंडीजचा संघर्ष सुरू ठेवला होता. या दोघांनी अखेरच्या षटकापर्यंत सामना चुरशीचा केला. १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फॅबियन बाद झाला. त्यानं १४ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह २९ धावा केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना आंद्रे रसेलसमोर मिचेल स्टार्क गोलंदाजीला होता. पण, स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर रसेलचे काहीच चालले नाही. स्टार्कनं चार चेंडू निर्धाव फेकली अन् रसेलला फक्त ६ धावा करू दिल्या. ऑस्ट्रेलियानं हा सामना ४ धावांनी जिंकला.
Web Title: Mitchell Starc defends 11 off the final over against Andre Russell, He goes - 0, 0, 0, 0, 0, 6 & Australia win by 4 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.