Mitchell Starc News World Cup Record : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात एक बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऐतिहासिक कामगिरी केली. तो आयसीसी वन डे आणि ट्वेंटी-२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगाला मागे टाकले. सुपर-८ मध्ये विजयी सलामी देण्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला यश आले. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत आणि पावसाने केलेल्या मदतीमुळे कांगारूंचा विजय सोपा झाला. पॅट कमिन्सने हॅटट्रिक घेत ऐतिहासिक कामगिरी केली. २००७ मध्ये ब्रेट लीने ट्वेंटी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. त्यानंतर विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.
विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे शिलेदार -
- मिचेल स्टार्क - वन डे (६५) आणि ट्वेंटी-२० (३०) - एकूण बळी (९५
- लसिथ मलिंगा - वन डे (५६) आणि ट्वेंटी-२० (३८) - एकूण बळी (९४)
- शाकिब अल हसन - वन डे (४३) आणि ट्वेंटी-२० (३४) - एकूण बळी (९२)
- ट्रेन्ट बोल्ट - वन डे (५३) आणि ट्वेंटी-२० (३४) - एकूण बळी (८७)
- मुथय्या मुरलीधरन - वन डे (६८) आणि ट्वेंटी-२० (११) - एकूण बळी (७९)
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केले. बांलादेशने दिलेल्या १४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे दोनवेळा सामना थांबवावा लागला. ६.२ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला. पावसानंतर पुन्हा सामना सुरू होताच ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. रिशाद हुसेनने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. २१ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने ३१ धावा केल्या. सात षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद ६५ धावा अशी होती. कांगारूंना नवव्या षटकात कर्णधार मिचेल मार्शच्या रूपात दुसरा झटका बसला. ११.२ षटकापर्यंत खेळ पोहोचला असता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद १०० होती त्यामुळे कांगारूंचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी पुढे होता. पाऊस कायम राहिल्याने अखेर डकवर्थ लुईस या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक (५३ नाबाद) खेळी केली.
तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, कर्णधार नजमुल हुसैन शांतोने कडवी झुंज देताना सर्वाधिक (४१) धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाला सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी १४१ धावांचे लक्ष्य दिले. मागच्या सामन्यात बाकावर बसलेल्या कमिन्सने या सामन्यात हॅटट्रिक घेतली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ॲडम झाम्पा (२), मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.