mitchell starc ipl 2024: आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण, अवघ्या दीड तासात चित्र बदलले अन् मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. पण, स्टार्कने नेहमीच फ्रँचायझी लीगपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जास्त महत्त्व दिले आहे. मात्र, आता तो तब्बल आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. खरं तर स्टार्कला इतकी वर्षे आयपीएलपासून दूर राहिल्याचे दु:ख नसून यामागील कारणही त्याने सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्टार्कने सांगितले की, आयपीएलमधील मोठ्या ब्रेकमुळे ताजेतवाने होण्यास आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत झाली. क्रिकेटमधील वेळापत्रक मांडणे फार कठीण काम आहे, एकाच वेळी दोन ठिकाणी उपलब्ध राहणे हे तर सोडूनच द्या... त्यामुळे मी नेहमीच क्रिकेटपासून दूर पत्नी अॅलिसासोबत किंवा कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला आहे. माझे शरीर ताजेतवाने ठेवले, तंदुरूस्त राहिलो आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तयार राहिलो. मी आयपीएलमधून एवढा वेळ बाहेर होतो याचा कोणताही पश्चाताप नाही. त्यामुळे माझ्या कसोटी क्रिकेटला नक्कीच फायदा झाला आहे, असे मला वाटते. पैसा नेहमीच चांगला असतो आणि या वर्षी देखील महत्त्वाचा होता. परंतु, मी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे आणि मला वाटते की यामुळे माझ्या खेळाला, संघाला मदत झाली आहे.
मिचेल स्टार्कवर तब्बल २४.७५ कोटींचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.
Web Title: mitchell starc ipl 2024 Australian bowler to play in IPL after eight years bought by Kolkata Knight Riders franchise for 24.75 crores
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.